

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता नागपूर ते गोवा महामार्ग तयार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२४) नागपुरात दिली. हा महामार्ग तयार करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. रस्ते विकासाचा प्लॅन फडणवीस यांनी सांगितला. नागपूर ते गोवा हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कनेक्टिव्हीटी वाढवायची आहे. राज्यातील कुठल्याही भागात ८ ते १० तास पोहचता येईल, असे रस्ते तयार करायचे आहेत. विदर्भाचा चेहरा बदलेल असे मार्ग आता तयार करणार आहोत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा चेहरा बदलेल.
समृद्धी महामार्ग नेक्स्ट इकोनॅामीकल कॅारिडॅार असणार आहे. स्वातंत्र्यापासून ते २०१४ पर्यंत मुंबई एमएमआर रिजनमध्ये तीन लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात आले. तेवढेच मी पाच वर्षांत केले, असल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन सरकार काम करणारे सरकार आहे. दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे चांगला विकास करायचा आहे. आम्हाला टी-२० ची मॅच खेळायची आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.