करंजी : महामार्गाच्या प्रलंबित कामास प्रारंभ ; आमदार नीलेश लंकेंच्या उपोषणाला यश | पुढारी

करंजी : महामार्गाच्या प्रलंबित कामास प्रारंभ ; आमदार नीलेश लंकेंच्या उपोषणाला यश

करंजी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या कल्याण विषाकापट्टणम् या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आता नवीन ठेकेदार मिळाला असून, त्याने लगेच कामाला सुरुवातही केली आहे. करंजी येथील नव्याने बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम सुरू करण्यात आले असून, करंजी पाठोपाठ देवराई, तिसगाव जवळील खारूळ नाला पूलाचेही काम ठेकेदाराने सुरू केले आहे. नवा गडी नवा डाव, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी नगर-पाथर्डी महामार्गाच्या रखलेल्या कामाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधत तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

या उपोषणाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. त्यानंतर रखडलेल्या कामालाही नवीन ठेकेदाराची नेमणूक करत सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक वेळा महामार्गाचे काम बंद पडल्यानंतर सर्वसामान्य जनतेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन अनेक वेळा रस्तारोको, आंदोलन, उपोषण केली. एवढेच नव्हे तर मुंडन करून संबंधित अधिकारी, ठेकेदारांचा दशक्रिया विधी घातला. आता पुन्हा या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले असून, आता हे काम पुन्हा कुठलेही विघ्न न येता पूर्णत्वास जावे हीच प्रवासी वर्गांसह सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

करंजी गावाजवळ नव्याने पूल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर देवराई जवळील बायपासचे देखील काम सुरू करण्यात आले आहे. पुढे तिसगाव जवळील खारूळनाला पुलाजवळ माती टाकून या पुलाचे काम सुरू करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे. असे असले तरी जांबकौडगाव, मराठवाडी, तिसगाव, निवडूंगे या ठिकाणी गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या नवीन फुलांचे काम प्रलंबित असून, ही अर्धवट पुलाची कामे कधी पूर्ण करण्यात येणार यालाही महत्त्व आहे. महामार्गाच्या कामाचे श्रेय कोणीही घ्या; मात्र नगर-पाथर्डीमार्गे जाणारा रस्ता तेवढा पूर्ण करा एवढीच सर्वसामान्यांची मापक अपेक्षा आहे.

Back to top button