नाशिक

सुरत-चेन्नई महामार्ग : पाचपट मोबदल्यासाठी शेतकरी रस्त्यावर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी थेट जमिनी खरेदी करतानाच पाच पट मोबदला द्यावा. सरसकट संभाव्य एनए देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी साेमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी प्रकल्पबाधितांनी चर्चा केली. तसेच सुरत-चेन्नई संघर्ष कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन दिले.

संबधित बातम्या :

सुरत-चेन्नई महामार्गावरून सध्या प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी थेट मोर्चा काढत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. संघर्ष कृती समितीतर्फे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यांत प्रकल्पासाठी ९९८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. बहुतांश गावांमध्ये खरेदीखते ही साधारणत: दीड ते तीन कोटी रुपये असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचे निवाडे जाहीर करताना रेडीरेकनर व अन्य कोणत्याही बाबी विचारात घेतलेल्या नाहीत. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीचे मूल्यांकन अतिशय कमी दाखविले आहे. जिल्ह्यातील सुरगाणा वगळता अन्य पाचही तालुक्यांमध्ये औद्योगीकरण झाले आहे. या पट्ट्यातील जमिनी डी झोनमध्ये असून, तेथील जमिनींचे खरेदीखत हे जास्त मूल्याचे असल्याचे सांगत ती नाकारल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध नाही. परंतु, मागण्यांच्या शासनाने विचार करावा. अन्यथा २ आॅक्टोबरला राज्यभरातील रस्ते जाम करण्यात येतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल, असा इशाराही कृती समितीमार्फत दिला आहे. माेर्चात कृती समितीचे अॅड. प्रकाश शिंदे, राजाराम कांडेकर, वसंत पेखळे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या

– संपादनावेळी जमिनीचे तुकडे पाडू नये.

-महामार्गाच्या दाेन्ही बाजूला सर्व्हिस रोड, अंडरपास, पाईपलाईन असावी

-अवॉर्ड करताना जास्त किमतीचे खरेदीखत विचारात घ्यावे

– शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून विशेष सवलतीत लाभ द्यावा

– भूसंपादनावेळी घरे, दुकानांचा रेडीरेकनरनुसार दर मिळावा

– रस्त्याच्या कामकाजात स्थानिकांना रोजगार द्यावा

– निवाडे करताना घरे, गोठे, शेततळे, पाइपलाइन, पॉलीहाउस, झाडे यांचा विचार करावा

– आडगावचे श्री मनुदेवी, धोंडवीर मंदिर देवस्थानाचे भूसंपादन करू नये

– निवाडेवेळी जिरायत, हंगामी बागायत व बारमाही बागायत वर्गवारी करून मोबदला द्यावा

महामार्गाला आमचा विराेध नाही. पण सर्व कार्यालयांनी चुकीचे निवाडे करून आमच्या जमिनी संपादित करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही लढा देत असताना कोणीही लक्ष दिलेले नाही. उलट केंद्र व राज्य सरकारला बळीराजाला चिरडण्याचे काम करते आहे. आमची मागणी सरळ असून, सर्व निवाडे रद्द करावेत. आमच्या जमिनी थेट खरेदी करताना पाच पट मोबदला व सरसकट संभाव्य एनए द्यावा.

-अॅड. प्रकाश शिंदे, सुरत-चेन्नई संघर्ष कृती समिती, नाशिक

वाहतूक कोंडी

ईदगाह मैदानापासून सुरू झालेला माेर्चा त्र्यंबकनाका, सीबीएसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालावर पोहोचला. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा दिल्या. मोर्चामुळे परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT