शरद पवार जालन्याला जातात, मग ते चौंडीला का येत नाहीत? : डॉ. स्नेहा सोनकाटे | पुढारी

शरद पवार जालन्याला जातात, मग ते चौंडीला का येत नाहीत? : डॉ. स्नेहा सोनकाटे

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजामुळे गेल्या ७० वर्षात बारामतीत जेष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ता उपभोगली. ते पवार साहेब जालन्याला पळत जातात. मग ते चौंडीला का येत नाहीत ? आपले ते लेकुरू आणि दुस-याचे ते कार्ट का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी उपस्थित करत ,असा दुजाभाव त्यांच्याकडुन अपेक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.

यशवंतसेनेच्या वतीने चौंडी येथे धनगर आरक्षणप्रश्री गेली १३ दिवसापासून आमरण उपोषण चालु आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनकाटे यांनी चौंडीला भेट देवून,आंदोलनाला पाठींबा दिला.यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

डॉ. सोनकाटे म्हणाल्या , चौंडी येथे गेली १३ दिवसापासून सूरू असलेल्या आंदोलनाकडे विरोधी पक्षांनीही पाठ फिरवली आहे. विधानसभेच्या १२० मतदारसंघात आणि लोकसभेच्या ४० मतदारसंघात धनगर समाज निर्णायक आहे. ज्यांनी आजपर्यंत धनगर समाजामुळे सत्ता उपभोगली त्यांना आता विसर पडला आहे का ? असा आमचा सवाल आहे.

धनगर समाजाची लोकसंख्या मोठी असताना आरक्षण मात्र केवळ साडेतीन टक्के आहे. त्यानुळे २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत धनगर समाज सत्ताधा-यांना जागा दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगीतले. धनगर आरक्षण लढा चौंडीतून सूरू झाला आहे.आता या लढ्याचा महाराष्ट्रात उद्रेक होणार आहे. असेही डाॅ.सोनकाटे यांनी सांगितले.

Back to top button