नगरसुल : तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध असतानाही डॉक्टरांनी ते न दिल्यामुळे सोमठाण जोश येथील एका तरुण महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची पार्श्वभूमी
राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, एका अधिकाऱ्याची बदली झाली असून दुसरे अधिकारी प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेले आहेत. त्यांच्या जागी दररोज वेगवेगळे डॉक्टर नेमले जात होते. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी ममदापूर उपकेंद्रातील डॉक्टरची नेमणूक करण्यात आली होती.
दरम्यान, सोमठाण जोश येथील सुरेखा धुराडे ही महिला उपचारासाठी आली असता, संबंधित डॉक्टरने तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला तातडीने येवला येथे पाठवले. सुरुवातीला हे डॉक्टर उपलब्ध नव्हते, नंतर आल्यावर त्यांनी कोणतीही चौकशी न करता महिलेला परस्पर येवला येथे पाठवले. येवला येथे पोहोचल्यानंतर काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला.
एकलव्य संघटनेचा आरोप व रोष
या घटनेची संपूर्ण जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकारी धारूर यांची असून, त्यांनी नेमलेले डॉक्टर शुभम वाघ यांच्या हलगर्जीपणामुळेच या महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप एकलव्य संघटनेने केला आहे.
याविरोधात सोमठाण जोश येथील एकलव्य संघटनेच्या वतीने राजापूर आरोग्य केंद्रात ठिय्या मांडण्यात आला. सकाळी नऊ वाजता आलेले नागरिक वैद्यकीय अधिकाऱ्याची वाट पाहत होते, मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत अधिकारी उपस्थित झाले नाहीत.
वैद्यकीय अधिकाऱ्याचा कारभार आणि गोंधळ
दोन वाजता आल्यानंतर नागरिकांनी संबंधित डॉक्टरशी चर्चा केली, परंतु त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. विशेष म्हणजे, या डॉक्टरचा अपघात झाला असून त्यांच्या पायाला प्लास्टर असतानाही ते छत्रपती संभाजीनगरवरून राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. अपघात झाला असताना रजा न घेता, नागरिकांना "आलोच, जवळ आलो आहे" असे सांगत तब्बल दोन वाजेपर्यंत ताटकळत ठेवल्याने आरोग्य केंद्रात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला, तसेच गावातील दोन प्रतिष्ठित नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याशी गुप्त चर्चा केली. मात्र, या अधिकाऱ्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
पोलिसांत तक्रार व आंदोलनाचा इशारा
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या भिल्ल समाजाच्या लोकांनी थेट येवला पोलीस स्टेशन गाठले. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून ममदापूरच्या डॉक्टरला तातडीने निलंबित करावे, अशी मागणी येवला तालुका पोलीस स्टेशनकडे करण्यात आली आहे. तसेच या प्रकारची तक्रार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी मोरे यांच्याकडेही गावकऱ्यांनी केली आहे.
येवला तालुक्यात जबाबदार अधिकारी नसल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा, अन्यथा आरोग्य केंद्रासमोर तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.