

हनिफ शेख
पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या आवारात काही दिवसांपूर्वीच घोणस जातीचा विषारी सापाची पिल्ले सापडल्याने खळबळ उडाली होती. पावसाळा सुरू होताच साप दिसण्याच्या आणि सर्प दंश होण्याच्या घटनेत मोठी वाढ होताना दिसते.
या पार्श्वभूमीवर सरकारी आकडेवारी घेतली असता फक्त जून महिन्यातच जवळपास दोनशे एकोणचाळीस नागरिकांना सापाने चावा घेतल्याची आकडेवारी समोर येत आहे. यामुळे खरंतर पालघर जिल्हावासियांनी सावध राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्प दंशावर उपयुक्त औषध साठा जिल्ह्यातील सगळ्या रुग्णालयात मुबलक प्रमाणात असल्याने सर्पदंशांच्या घटनेत एकही मृत्यू न झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे मोखाडा तालुक्यात चार दिवसांपूर्वीच एका दिवसात तब्बल 12 जणांना सर्पदंश झाल्याचे समोर आले होते. या सर्वांना मोखाडा उपजिल्हा रुग्णालयातच उपचार देण्यात आल्याची ही माहिती तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
जून 2026 या एकाच महिन्यातील तालुका न्याय आकडेवारी पाहता, उपजिल्हा रुग्णालय डहाणू -24, उपजिल्हा रुग्णालय कासा 20, ग्रामीण रुग्णालय वाणगाव १०, ग्रामीण रुग्णालय पालघर 23, ग्रामीण रुग्णालय मनोर अठ्ठावीस ग्रामीण रुग्णालय बोईसर 13, उपजिल्हा रुग्णालय जव्हार 17, ग्रामीण रुग्णालय विक्रमगड 17, ग्रामीण रुग्णालय तलासरी 35, ग्रामीण रुग्णालय विरार 4, ग्रामीण रुग्णालय वाडा 29 आणि ग्रामीण रुग्णालय मोखाडा 19 अशी ही एका महिन्यातील आकडेवारी आहे.
या आकडेवारीनुसार अतिदुर्ग डोंगराळ भागातील नागरिकांना सर्पदंश झाल्याच्या घटना अधिक आहेत. यामुळे शेतावर जाताना किंवा अंधारात पायवाटेने जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात सर्पदंशांच्या घटना वाढण्याची काही कारणे सांगण्यात येतात यामध्ये पावसामुळे जंगलात, शेतात, डोंगरात सापांची बिळं पाण्याने भरतात.
म्हणून जीव वाचवायला साप बाहेर पडतात आणि माणसांच्या वस्ती, घरं, गोदाम यात आश्रय घेतात, याशिवाय पावसात बेडूक, उंदीर, पाली यांची संख्या वाढते. हे सापांचे मुख्य खाद्य आहे. अन्नाच्या शोधात साप शेतात, घराजवळ, ओसरीवर येतात.
याशिवाय ओल्या मातीत आणि गवतात साप लपतात. आपल्याला दिसत नाहीत. शेतात काम करताना, रात्री टॉर्चशिवाय चालताना पायाखाली आल्याने साप चावतो. सापही घाबरून स्वतःच्या संरक्षणासाठी चावतो. पावसाळ्यात हवेत दमटपणा असतो.
या वातावरणात साप जास्त active होतात. आणि आपणही रात्री उशिरा शेतात/बाहेर असतो त्यामुळे मानवी संपर्क वाढतो. तर ग्रामीण बरोबर शहरी भागात देखील जसं की वाडा, विरार, बोईसर सारख्या ठिकाणी नवीन बांधकामं आणि झाडी आहे. पाणी शिरल्यावर साप थेट घरात, टॉयलेटमध्ये, सामानाखाली लपतात पालघर जिल्हा जंगल, डोंगर आणि आदिवासी पट्ट्याचा आहे त्यामुळे पावसाळ्यात इथे आकडा जास्त असतो.
डहाणू, तलासरी, मोखाड्यात यामुळेच प्रमाण जास्त आहे. मुळात आज यावर प्रभावी उपचार असल्यामुळे सर्पदंशांनी मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र अशा घटनांमध्ये नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेणे आवश्यक आहे.
मग काय काळजी घ्यायची?
रात्री टॉर्चशिवाय बाहेर जाऊ नका विशेषतः शेतात, गवतात. घराभोवती स्वच्छता ठेवा गवत, लाकडं, दगडाचा ढीग काढा. झोपताना उंचीवर झोपा साधारण झोपण्यासाठी पलंग घाट याचा वापर करा आणि जमिनीवर झोपत असाल तर जागा झाडून घ्या. साप दिसल्यास मारू नका 1926 वनविभाग किंवा स्थानिक सर्पमित्राला फोन करा. दंश झाल्यास घाबरू नका, पट्टी बांधू नका,1 तासात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात जा. पालघरमध्ये ASV सर्वत्र उपलब्ध आहे.