Sayaji Shinde Protests Tapovan Tree-Cutting Pudhari
नाशिक

Sayaji Shinde: तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे आक्रमक; सरकारला थेट सुनावलं. 'वैर झालं तर होऊद्या, पण...'

Sayaji Shinde Protests Tapovan Tree-Cutting: नाशिकच्या तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पासाठी 1,800 दुर्मिळ झाडे तोडण्याच्या निर्णयावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Rahul Shelke

Sayaji Shinde Tapovan Tree Cutting Controversy: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या वास्तव्यासाठी तपोवन परिसरात ‘साधूग्राम’ उभारण्याचे काम करायचे आहे. मात्र, या कामासाठी 1,800 दुर्मिळ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आल्यानंतर नाशिककर, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक संस्था संतप्त झाल्या आहेत. या आंदोलनात आता अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सरकारला इशारा दिला आहे.

'तुमच्या प्रकल्पासाठी आमची झाडं नाही तोडू देणार'

शिंदे यांनी तपोवनात भेट देत झाडांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या प्रस्तावावर जोरदार टीका केली. ते म्हणाले “ही झाडंच आपला श्वास आहेत. कुणीही आला, साधू असो किंवा मंत्री, पण इथलं एकही झाड तोडायचा विचारही करू नये. आम्ही ते होऊ देणार नाही.” त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना नाव न घेता तीव्र शब्दांत सुनावलं “तुमचं-आमचं वैर झालं तर होऊद्या, पण झाडांना हात लावाल तर परिणाम भोगायला तयार राहा.”

'झाडांसारखा सेलेब्रिटी दुसरा कोणी नाही'

सयाजी शिंदे यांनी सांगितलं “या जगात झाडं हीच खरी सेलेब्रिटी आहेत. सावली, हवा, फळं, फुलं, जीवन देणारे झाडं आहेत. मी इथे स्टार म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून आलो आहे. कारण झाडं वाचली तरच नाशिक वाचेल.” सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.

तपोवनातील बहुसंख्य झाडांमध्ये वड हा प्रमुख वृक्ष आहे, देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. शिंदे म्हणाले “सरकारनेच सर्वाधिक वडाची झाडं तोडली आहेत, हे देशाचं दुर्दैव आहे. वड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतो, प्रदूषण शोषतो. त्याच वडावर फुली मारली तर आम्ही शांत बसणार नाही.”

साधूग्रामच्या गरजेवरही प्रश्नचिन्ह

ते पुढे म्हणाले, “साधूग्राम नेमका कोणासाठी? 10 माणसांच्या गरजेसाठी हजारोंची गर्दी कशाला? साधूग्रामच्या नावाखाली झाडांचा बळी देणं हा धर्म नव्हे तर अधर्म आहे.”

'नाशिककरांनो, सरकारला एकही झाड तोडू देऊ नका'

शिंदेंनी शेवटी सर्व नागरिकांना स्पष्ट सांगिलं की “ही झाडंच आपला वारसा आहेत. एकही झाड पडलं तर तो संत परंपरेचा, शिवरायांचा, तुकारामांचा अपमान ठरेल. सरकारने फसवणूक करू नये. आम्ही झाडांच्या बाजूने उभे आहोत, तुम्हीही उभे रहा.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT