

Nashik Tapovan Tree Cutting
नाशिक : नाशिकच्या तपोवनातील साधुग्राम प्रकल्पावरून तुफान वाद पेटला आहे. १८२५ झाडांच्या कत्तलीवरून आधीच संघर्ष पेटलेला असताना, आता साधुग्रामच्या त्याच जागी २२० कोटींच्या पीपीपी तत्वावरील एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी महापालिकेने निविदा जारी केल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे. यावर आता जगद्गुरू शंकराचार्य यांनी प्रतिक्रिया दिली असून वृक्षतोडीचे पाप करू नये, कुंभमेळा झाल्यानंतर झाडे तोडलेल्या जागेवर सरकारी प्रकल्प उभारला जाईल, त्यामुळे साधू महंतासाठी झाडे तोडू नयेत, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १२०० एकर जागेवर साधुग्राम उभारणीचा प्रस्ताव पुढे आला आहे. गत कुंभमेळ्याच्या तुलनेत चार ते पाच पट गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आणि याच तयारीदरम्यान १८२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव समोर आला.
पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि सामाजिक संघटना झाडांच्या कत्तलीला तीव्र विरोध करीत आहेत. आंदोलनाचा आवाज इतका बुलंद झाला की आता सेलिब्रेटी आणि राजकीय नेतेही उघडपणे भूमिका घेत आहेत. तर दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी २०१५ पूर्वीची मोठी झाडे तोडली जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, पीपीपी तत्वावर २२० कोटींच्या एक्झिबिशन सेंटर उभारणीसाठी निविदा जारी झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. तपोवनातील जागा मोकळी करून देण्यासाठीच वृक्षतोडीचा घाट घातला का? खरी तयारी साधुग्रामसाठी आहे की व्यावसायिक प्रकल्पासाठी? असा सवाल उपस्थित करत मनपा प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले आहे.
पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांनी मनपाच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावाला विरोध दर्शविल्यानंतर लागलीच एक्झिबिशन सेंटरच्या हालचाली होऊ लागल्याने अभिनेत्यांसह राजकिय नेत्यांनी कडाडून विरोध होऊ लागला आहे. पर्यावरण प्रेमींनी सरकारवर टीका केली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी तर थेट तपोवनात पाहणी करत श्रीराम आणि शिवाजी महाराजांचा सरकार अपमान करत असल्याचा आरोप केला आहे.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत एक्सपोस्ट करत वृक्षतोडीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात नाशिककरांना भूमिकेवर ठाम राहण्याची मागणी करत आंदोलनाला पाठिंबा असल्याची भूमिका घेतली आहे.