Environmentalists' signature campaign against Tapovan Tree Cutting
नाशिक : तपोवनात साधुग्राम उभारणीच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी स्वाक्षरी मोहिम सुरू केली असून या स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत ७४२९ जणांनी सहभाग घेतला आहे. या चळवळीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नाशिककरांचा आवाज पोहोचविला जाणार आहे.
पर्यावरणप्रेमी वृक्षतोड रोखण्यावर ठाम
साधुग्रामसाठी तपोवनातील १२०० एकर जागा प्रस्तावित केली आहे. सध्या मनपाच्या ताब्यात असलेल्या ५४ एकर जागेवर साधुग्राम उभारण्यासाठी १८२५ वृक्ष तोडण्यासंदर्भात हरकती मागविल्या होत्या. त्यावर जवळपास नऊशेपेक्षा जास्त हरकती मनपाकडे प्राप्त झाल्या. त्याची सुनावणी झाली असता त्यास विरोध झाला होता. प्रशासनाने जुने वृक्ष तोडले जाणार नाही. साधुग्रामच्या लेआऊटमध्ये बदल केला जाईल, असे स्पष्ट केले असले तरी पर्यावरणप्रेमी वृक्षतोड रोखण्यावर ठाम आहेत. या चळवळीचा एक भाग म्हणून स्वाक्षरी मोहिम राबविली जात आहे.
पर्यावरण संवर्धन परिषदेचे निवेदन
वृक्षतोडी विरोधात पर्यावरण वन जलवायू परिवर्तन संवर्धन महाराष्ट्र परिषदेतर्फे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना शुक्रवारी(दि.२८) निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुंदरलाल बोथरा, परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे निर्देशक प्रदीप कुमार क्षत्रीय, जिल्हाध्यक्ष राजीव घोडेराव, सारंग साळवी, मल्हार कापडे, सुधीर वाघ, हिरालाल पवार उपस्थित होते.