Nashik Tapovan Tree Cutting : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात उद्धव ठाकरेही मैदानात
नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात?, असा खडा सवाल ठाकरे यांनी केला. हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू असून 'राम राम' करायचे आणि नाशिकमध्ये 'मुंह मे राम, बगल मे अडानी' असे काम करायचे, अशा हिंदुत्वाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवर ठाकरे यांनी भूमिका मांडली. प्रभू रामचंद्र वास्तव्याची श्रद्धा असलेल्या तपोवन परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तपोवनात 60 हून अधिक प्रजातींची झाडे, त्यातील अनेक औषधी वनस्पती आणि ऐतिहासिक परंपरा असताना, कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली येथे 'कत्तली' होणार असल्याचे ते म्हणाले. या तपोवनाने आपल्याही पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेले असतील. गिरीश महाजन म्हणतात, एक झाड कापलं तर दहा झाड लावणार तर एवढी जागा जिथे असेल मग तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत? असा सवाल करत आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
साधुग्रामला विरोध नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, साधुग्राम उभारण्याला आमचा विरोध नाही, पण साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील हजारो झाडांची हत्या करण्याच्या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे. सरकार हे काम पुण्य कमावण्याचा उपद्व्याप दाखवत करत आहे, परंतु प्रत्यक्षात हा निसर्गविनाशाचा प्रयत्न असून यात हिंदुत्वाचा आडोसा घेतला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
कंत्राटदारांच्या विकासाचा डाव
तपोवनातील साधुग्रामसाठी प्रस्तावित जागेत पीपीपी तत्वावर एक्झिबिशन सेंटर उभारण्याची निविदा जारी करण्यात आली आहे. त्यामुळे कुंभमेळा हा फक्त कारण म्हणून पुढे केला जात असून प्रत्यक्षात हा कंत्राटदारांचा विकास करण्याचा डाव आहे. तपोवन ही भूमी कोणाच्या गळ्यात घालण्यासाठीच आज झाडे नष्ट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यामुळेच पालकमंत्रिपदाचा तिढा
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेनेचा ठाम विरोध राहील, असे स्पष्ट करतानाच त्यांनी कुंभमेळ्यातील खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या भूमिकेमुळेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याचा गंभीर आरोपही केला. याचवेळी त्यांनी राज्यसभा सचिवालयाच्या सदस्यांच्या वर्तवणुकीसंबंधी परिपत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला खडे बोल सुनावले.

