नाशिक

Pudhari Special Ground Report | नियम धाब्यावर.. विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर!

वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरुन धोकादायक प्रवास! व्हॅनमध्ये सहाय्यक- वाहकाचा अभाव; विद्यार्थ्यांची ससेहोलपट; पालकांचेही दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी टीम

स्कुल व्हॅन, रिक्षामधून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, या वाहनधारकांकडून सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे वास्तव दै. ‘पुढारी’च्या पहाणीत आढळून आले आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाहनात कोंबणे, वाहनाची तांत्रिक स्थिती उत्तम नसणे, वाहनाबाहेर लटकलेली दफ्तरे, वाहनात सहायक नसने यासह स्कूल बस धोरण २०११ च्या नियमावलींचा भंग करणाऱ्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांची ससेहोलपट तर होतेच शिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण हाेत आहे. एकिकडे वाहनांसाठी मासिक भाडे परवडत नाही म्हणून चालक अधिक विद्यार्थी वाहनात बसवतात तर दुसरीकडे पालकही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवांशी खेळ खेळला जात असल्याचे भीषण वास्तव आहे.

व्हॅन चालक संतोष सपकाळे यांच्याशी संवाद ...

प्रश्न : व्हॅनमध्ये विद्यार्थी क्षमता किती आहे ? किती विद्यार्थीची वाहतूक करतात ?

उत्तर : ८ आधिक चालक अशी क्षमता आहे. तरी कारचे आसने काढून १६ विद्यार्थी नेले जातात. बाक काढले नाही तरीही लहान मुले असल्याने १५ ते १६ विद्यार्थी बसवतो.

प्रश्न : पोलिसांकडून कारवाई केली जाते का?

उत्तर : परमीट, टॅक्स, इन्शुरन्स, पीयूसी आदी गोष्टीची पूर्तता केली तर कारवाई होत नाही. सर्व गोष्टी जवळ बाळगतो. आरटीओ अधिकारी अन‌् स्कॉडकडून नियमित चेकिंग होते. छोटी मुले आहेत. थोडे अधिक चालून जाते. जितके नियम मोडू तितका अधिक दंड आकारला जातो. १ रुपयांपासून ते २५ ते ३०हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.

प्रश्न : मुलांच्या सुरक्षिततेसाठी वाहनात काय उपाययोजना?

उत्तर : अग्नीविरोधी यंत्रणा, सर्व विद्यार्थ्यांचे इशुरन्स केले आहे. शाळांकडून आम्हाला स्कूल बस म्हणून अधिकृत पत्र दिले जाते. खाजगी व्हॅनवाले गाडीवर स्कूल व्हॅन नाव टाकातात. आमच्या वाहनाला शाळेकडून परवानगी आहे. गाडीची नियमित सर्व्हिसिंग केली जाते. वाहनांचा वेग दर लॉक केलेला आहे.

प्रश्न : पालकांकडून मासिक दराबाबत काय व्यवहार होतो?

उत्तर : विद्यार्थ्यांना घरापर्यंत सोडतो. अंतरानुसार मासिक भाडे आकारले जातात. साधारणत: ५ किमी च्या आत घर असले तर १५०० रुपर्यांपर्यत मासिक भाडे घेतो. अंतर जास्त असेल तर त्यानुसार रेट ठरतात. पालकांनाही ते ही दर देणे परवड नाहीत म्हणून ते घासाघिस करतात. दोन- तीन महिन्यांनंतर एकदम भाडे देतात. शाळेच्या बस वर्षाच्या आधी संपूर्ण रक्कम आधीच घेतात. आम्ही महिन्याला घेतो. स्कूल बसपेक्षा आमचे भाडे ६ ते ७ हजार रुपयांनी स्वस्त होते. कमी भाडे आम्ही घेतो. शिवाय अकरा महिन्याचे भाडे घेतो.

श्रमिक सेनेचे महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्याशी संवाद ...

प्रश्न : स्कूल रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबले जातात.

उत्तर : आमच्या संघटनेतत एकूण १५ हजार नोंदणीकृत सभासद आहेत. त्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाते. शाळांकडूनही शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅन्स चालकांना प्रमाणपत्र दिले जाते. सुरक्षित प्रवासासाठी जी मार्गदर्शक तत्वे असतात. त्याचे पालन केले जातेच. जे नियम मोडतील आणि धोकादायक पद्धतीने प्रवास करतील त्यांच्यावर जरुर कारवाई करावी. संघटना म्हणून आम्ही त्यांच्या आड येणार नाही.

प्रश्न : काही रिक्षाचालकही बेजाबदारपणे चालवताना दिसतात?

उत्तर : आमच्या संघटनेमध्ये नोंदणी झालेल्या वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करावी. आम्ही संघटना म्हणून त्यांना कधीही पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.

प्रश्न : संघटनेने रिक्षाचालकांसाठी काय उपक्रम राबवते.

उत्तर : संघनेतील सर्व चालक परवानाधारक आहेत. त्यांनी गणवेश, परवाना, शाळेतील मुलांना नेत असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. बहुतांश शाळांकडून मुलांना असे प्रमाणपत्र दिले जाते. संघटना वेळोवेळी रिक्षाचालकांसाठी नियमांचे पालनासंदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम घेत असते.

शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र वाहतुक सेना, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अझीम सय्यद यांच्याशी संवाद

प्रश्न : व्हॅनमधून अधिक संख्यने विद्यार्थी वाहतुक होते.

छोट्या स्कूलच्या व्हॅनमधून विद्यार्थी वाहतुकीसाठी परवाणगी देण्यात यावी, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे निवेदन दिले. त्यांनी ९ अधिक १ याप्रमाणे सिट संख्येसाठी समंतीही दर्शवली. येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी अपेक्षित आहे. नवीन गाड्यांसाठी परमीट मिळत नाही. उपलब्ध गाड्यांसाठी मागणी जास्त असल्याने एका वाहनात मुलांची संख्या वाढते. मोठ्या स्कूल बसेस छोट्या गल्ली, वसाहती, स्लम भागात जात नाहीत. पालकांचे घरापर्यंत स्लम भागात जात नाही. त्यामुळे व्हॅनमधून मुलांची ने आण-होत असते.

प्रश्न : नोंदणीकृत व्हॅनधारक किती आहे?

नाशिकमध्ये साडेसहा हजार नाेंदणीकृत व्हॅन सभासद आहेत नवीन गाड्यासाठी परमीट देणे सुरु झाले तर वाहन संख्या वाढेल. व्हॅन चालकांची आर्थिक स्थिती बेताची असते. शाळांच्या बस मध्ये जितके पैसे लागतात. त्यापेक्षा कमी पैशात व्हॅनचालक मुलांची सुखरुप ने-आण करतात.

प्रश्न : सुरक्षा नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

व्हॅनचालक स्वत:च्या मुलांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी १०० टक्के घेत असतो. सुरक्षेसाठी नियम पाळले जातात. स्कूल व्हॅन एक दिवस बंद झाल्या तर अर्धाहून अधिक शाळांची पटसंख्य अत्यंत कमी होईल. आजवर एकाही व्हॅनमधून मुलांची दुर्घटना झाली नाही.

प्रश्न : नियमभंग करणाऱ्या व्हॅनचालकांचे प्रमाणही वाढले आहे.

जे नियम मोडून बेदकारपणे वाहने चालवतात. वाहतुक नियमांचे उल्लंघन करतात अशांवर कारवाई केली जावी. संघटनेतर्फे वाहन चालकांसाठी वाहतुक सुरक्षा विषयांवर बैठक घेतो. शिबिरे, कार्यशाळांचे आयोजन करतो.

प्रश्न : व्हॅन चालक संघटनेची सरकारकडे काय मागणी आहे.

संघटना नोंदीकृत वाहनांमध्ये वेगमर्यादा नियंत्रक साधने आहेत ती चांगली आहेत. ती बदलून नवीन लावण्यासाठी सक्ती केली गेली. त्याविरोधात आम्ही मुंबईत मोर्चा नेला. नियमावलीत नमूद शाळांकडून वाहन चालवण्यासाठी पत्र अनिवार्य आहे. ती अट रद्द करावी, मोठ्या स्कूल बसला परमीट घेण्यासाठी ज्या प्रमाणे १०० रुपये टॅक्स असतो, तसाच तो व्हॅनचे परमीट करिताही लागू करावा. शाळेच्या आवारात परमीट असलेल्या व्हॅनला आत येऊन मुलांना नेण्याची परवानगी द्यावी, ही मागणी आमची मागणी आहे.

शहरातील शालेय वाहन संख्या अशी

  • स्कूल व्हॅन-६ हजार (आसन क्षमता : ७ प्लस-१, १३प्लस१, १५ प्लस१,१७ प्लस-१,१९ प्लस)

  • स्कूल रिक्षा-१,५००

तक्रारीसाठी येथे संपर्क साधा...

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुक, कमाल भाडे पेक्षा अधिक भाडे आकारणी, रस्ते सुरक्षिततेसंबंधी समस्या आदी अप्रवृत्तीविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेला टाेल फ्रि क्रमांक : 18002331516

संस्थाचालक म्हणतात...

कायद्यानुसार वाहनाची क्षमता असते तितकेच विद्यार्थी बसवले जावे. पालकांनाही आणि वाहनचालकांनाही ते परवणारे नाही म्हणून शासनानेच गरीब विदयार्थ्यांसाठी बसेसची योग्य व्यवस्था करुन द्यावी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना दिली जाते तशी सवलत शालेय मुलांना द्यावी. शिक्षणव्यवस्था सुधारायला हवी तर विद्यार्थी 'ट्रान्सपोटेशन' साठी शासनाने बसेस द्याव्यात-
प्रकाश वैशंपायन, अध्यक्ष, दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्युट, नाशिक.
पालकआर्थिक अडचणीमुळे आपल्या पाल्याला खाजगी स्कूल व्हॅन- रिक्षातून शाळेत पाठवतात. अशा पद्धतीने मुलांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा पालकांनीही मुलांसाठी थोडे बजेट वाढवावे. व्हॅन असोशिएशनेही सध्याच्या मासिक दर कमी करुन सुवर्ण मध्ये साधला पाहीजे.
सचिन जोशी. अध्यक्ष, इस्पॅलियर स्कूल , नाशिक.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेणाऱ्या वाहनातून पालकांना पाल्य पाठवूच नये. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई तसेच प्रसंगी विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाते. कधी अचानकही स्कॉडसह रस्त्यावर उतरुन वस्तुस्थितीचा आढावा घेतो.
प्रदीप शिंदे. प्रादेशिक परिवहन अधिकारी.नाशिक.

तर पालकांचे म्हणणे असे ...

मोठ्या शाळांमधील स्कूल बस मुख्य मार्गावर थांबतात. त्यांचे दरही अधिक असतात. त्यामुळे मुलांना व्हॅनमधून शाळेत पाठवतो. मात्र व्हॅन चालकांनी मुलांच्या संपूर्ण सुरक्षितेची जवबादारी घ्यावी.
तृप्ती महाले, पालक
अनेक अनुदानप्राप्त शाळांकडे स्वत:ची स्कूलबस नसते. पालकाही व्यग्र असल्याने दुचाकीवरुन रोज मुलांची शाळेत ने-आण करु शकत नाही. त्यामुळे रिक्षा-व्हॅन शिवाय पर्यायच नसतो. त्यांच्याशी ओळख असल्याने चिंता नसते.
सुधाकर आव्हाड, पालक
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ज्या व्हॅनमधून नेले जातात अशा व्हॅनमधून पालकांनी मुलांना शाळेत पाठवूच नये. खासगी व्हॅन चालकांनी पालकांकडून अधिक दर आकारु नये. मुलांच्या जीवाशी खेळू नये. पालकांनीही नियमाप्रमाणे पैसे द्यावे. गरज पडल्यास या विरोधात संघटनेच्या शाळा वाहतुक विभागाच्या माध्यमातून लढा उभारु.
नीलेश साळुंखे. नाशिक पॅरेंटस असोसिएशन
अनेक शाळा खाजगी व्हॅनचालक तसेच पालकांच्या वारंवार मिटींग घेऊन मुलांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल मार्गदर्शन करत असतात. मुले आणि मुलींना त्यांच्या बॅगांसह कोंबून एकत्र शाळेत नेले जाते ते अत्यंत चुकीचे आहे. त्याच्यात भांडणे, मारामारी होऊन धोका संभवतो. मुलींसाठी स्वतंत्र मागे असावा. मुलांसाठी मध्ये किंवासमोर जागा असावा आणि त्यात नियमानुसार मुले नेली जावी. शाळांच्या बसमधून सुरक्षित प्रवासाची हमी असते. पालकाही पैसा वाचवण्यासाठी खाजगी वाहनांमधून मुलांना शाळेत पाठवतात. आजची मुले उद्याचे भविष्य आहे. त्यांना जपलेच पाहीजे.
विद्या मोहाडकर, निवृत्त शिक्षिका.

स्कूलची मैदानांवर वाहनांना प्रवेश नाही

  • शहरातील बहुतांश शाळांच्या आवारात मोठे पटांगण असूनही स्कूल बस तसेच व्हॅन्स तसेच पालकांच्या खाजगी वाहनांना गेटच्या आत येण्याची परवानगी नाकारली जाते. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुक ठप्प होत असल्याचे दिसून आले.

  • तसेच शालेय बसेस सुसाट वेगाने जातात. त्यामुळे लहान मुलांसह पादचारी, दुचाकी वाहनचालकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: नवीन नाशिक, मुंबई-आग्रा महामार्ग, सिडको इंदिरानगर, जत्रा हॉटेल, बळीमंदिर ते दिंडोरी रोड या भागात बस, वाहने सुसाट वेगाने धावताना दिसतात.

स्कूल वाहनांमुळे वाहतुक दररोज होतेय  ठप्प

शहरात नेहरु गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने सिबीएस आदी भागातील शाळाजवळ बेशिस्तपणे मुख्य रस्त्यांवरच स्कूल व्हॅन, रिक्षालावून विद्यार्थ्यांची वाट पाहतात. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी या भागात रहदारी ठप्प हाेऊन मुलांच्या वाहनालाही धोका संभावतो. वाहने गर्दीपासून दूर उभी करुन शिस्तीत विद्यार्थ्यांची वाहतुक करावी, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन तसेच पालकांनी केली. काही व्हॅन्समधून मुलांची अनधिकृत वाहतुक केली जात असल्याचेही दिसून आले. अनेक व्हॅनवर स्कूल व्हॅन- चिन्ह, शाळांचे नाव, नंबर, रेडियम आदी आवश्यक तपशीलही नसल्याचे दिसून आले.

स्कूल बस धोरण-२०११ नियमावली अशी...

  1. बसेस, वाहनांची यांत्रिक व इतर स्थिती उत्तम असेल. विद्यार्थी प्रवासासाठी परवाना असेल आणि वाहने, पिवळ्यारंगाची असली पाहीजे. वाहनाचे पुढे आणि मागे शालेय बस असे ठळक अक्षरात नमूद हवे.

  2. वाहनाचे विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यां प्रवास करु शकणार नाहीत.

  3. शाळेच्या 'आत'व 'बाहेर'जाण्याच्या फाटकासमोर १००मीटर परिसरात शाळेचे कंत्राटी वाहन असल्याचा परवाना नसेलेले कोणतेही खाजगी वाहने,रिक्षा टॅक्सी थांबवण्यास परवानगी नाही.

  4. वाहनचालक, महिला साहायक, स्वच्छक यांच्या ओळखीसाठी गणवेश विहित करावा. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे.

  5. आणीबाणीच्या वेळी संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक, विद्यार्थी नावे व त्यांचे रक्तगट यांची माहिती वाहनात असावी.

  6. मुलांनी ने-आण करताना कुठलेही संगीत/गाणे वाजवण्यावर प्रतिबंध, वाहन सुरु असताना त्याचे दरवाजे कडी-लॉकने बंद असावे.

  7. वाहनात प्रथमोपचार पेटी, औषधी उपलब्ध असावी. ५ किलोची अग्नीशामक यंत्र असावी. सर्व आसने समोरील बाजूची असावीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT