

चांदवड (नाशिक) : तालुक्यातील दहेगाव- अस्तगाव रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून, याच पाण्याच्या डबक्यातून, चिखलातून शालेय विद्यार्थ्यांना आपली वाट काढावी लागत आहे.
पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवासामुळे विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले असून, लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
इतर जिल्हा मार्ग क्रमांक २८१ हा रस्ता दहेगाव (ता. चांदवड) ते अस्तगाव (ता. नांदगाव) या दोन गावांसह दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर दररोज मोठी वर्दळ असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे सर्वांसाठी जिकिरीचे झाले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांत पावसाचे मोठमोठे डबके साचलेले आहेत. तसेच चिखलही झाला आहे. या रस्त्यावर असलेल्या एकलव्यनगर, बिडगर वस्ती, सरोदे वस्ती या वस्त्यांसह या परिसरातील मुले शिक्षणासाठी दहेगावच्या जिल्हा परिषद शाळेत येतात. या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे मुलांना दररोज या चिखलातून प्रवास करावा लागत आहे. पाण्याच्या डबक्यातून, चिखलातून प्रवास करताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने जाताना शाळेचे बूट, चपला, शॉक्स खराब होणार नाही यासाठी विद्यार्थी ते हातात काढून घेत पायी चिखलातून ये- जा करतात. या दररोजच्या त्रासाला ही मुले कंटाळली आहेत. दहेगावच्या विद्यार्थ्यांची वाईट परिस्थिती बघून, या रस्त्याची दुरुस्ती लोकप्रतिनिधींनी तत्काळ करावी अशी मागणी केली जात आहे.
दहेगाव ते अस्तगाव हा जिल्हा परिषदेचा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रस्ता दुरुस्त झाला नाही, तर सर्व ग्रामस्थ उपोषणास बसणार आहोत.
गजानन पगारे, ग्रामस्थ.