Pudhari Special Ground Report | मनस्तापाचा 'बोगदा'

इंदिरानगर बोगद्यात वाहतुक कोंडीची समस्या तीव्र
नाशिक
द्वारका सर्कलनंतर सर्वांधिक वाहतुक कोंडी होणारे शहरातील ठिकाण म्हणजे इंदिरानगरचा बोगदा आहेPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी टीम

द्वारका सर्कलनंतर सर्वांधिक वाहतुक कोंडी होणारे शहरातील ठिकाण म्हणजे इंदिरानगरचा बोगदा. हा बोगदा जेव्हापासून वाहतुकीसाठी खुला केला, तेव्हापासून वाहनधारकांना या बोगद्यातून प्रवास करताना दिलासा कमी अन् मनस्तापच अधिक सहन करावा लागला. प्रारंभी हा बोगदा सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, वाहतुक कोंडीची समस्या तीव्र होऊ लागल्याने, दोन्ही बाजुने बोगद्याची उंची केवळ ९ फुट ठेवत अवजड व मोठ्या वाहनांसाठी हा बोगदा बंद केला गेला. तरीही समस्या 'जैसे थे'च असल्याने, हा बोगदा वाहनधारकांसाठी सातत्याने मनस्ताप देणारा ठरत आहे. विशेषत: चाकरमान्यांसाठी बोगदा अजिबातच परवडणारा नसून, नेहमीच वेळेचा अपव्यय करणारा ठरत आहे. बोगद्यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीची वाढती समस्या लक्षात घेता, लोकप्रतिनिधींनी निवेदनांचा मारा करीत त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र सर्व उपाय लालफितीत असल्याने, बोगद्यातील कोंडीतून नाशिककरांची केव्हा सुटका होणार, हाच खरा प्रश्न आहे.

Summary
  • बोगद्याची लांबी - २० मीटर

  • दररोज - सुमारे ७० हजार वाहनांंची वर्दळ

  • दोन शिफ्टमध्ये - प्रत्येकी २ वाहतुक पोलिस नियुक्त

डझनभर उपाययोजना, अंमलबजावणी मात्र नाहीच

  • दहा वर्षांपूर्वी इंदिरानगर बोगदा सुरू केला जावा, यासाठी मनसे, शिवसेना रस्त्यावर उतरली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली गेली. तसेच वाहनचालकांकडून अर्ज भरून घेत सर्वेक्षणही केले गेले.

  • बोगदा सुरू केल्यानंतर वाहतुक कोंडीची मोठी समस्या उद्भवल्यानंतर पोलिसांनीच सिमेंटच्या ब्लॉकने बोगदा बंद केला होता. मात्र, नागरिकांचा संयम सुटल्याने, त्यांनी सिमेंटचे ब्लॉक हटवित बोगदा वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केला. तेव्हा बोगदा निर्मितीत चुका केल्याची अनेकांना जाणीव झाली.

  • इंदिरानगर बोगद्यावर उपाय म्हणून माजी खासदार हेमंत गोडसे यांनी, बोगदा दोन्ही बाजुला साडेसात मीटर वाढवून त्यावर दोन्ही बाजुने साधारणत: तीन मीटर उंचीचे समांतर उड्डाणपूल बांधण्याचे सूचविले होते.

  • पुणेरोड ते मुंबई इंदिरानगरमार्गे जाणारी अवजड वाहने त्वरीत वळविण्यात यावे, यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना सूचविले होते. त्यानंतर ही वाहतूक अन्य मार्गे वळविली गेली. मात्र, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत याच मार्गे खुली ठेवण्यात आली.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०२२ मध्ये बोगद्याची रूंदी वाढविण्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केल्यानंतर, अनेक राजकारण्यांनी याचे श्रेय घेण्यासाठी बोगदा परिसरात फकलबाजी केली. मात्र, रूंदी अद्यापही वाढविली गेली नाही.

  • जुलै २०२२ मध्ये माजी खासदार हेमंत गोडसे यांनी इंदिरानगर आणि राणेनगर बोगद्यांची दोन्ही बाजुने १५ मीटर रूंदी वाढविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी प्रस्तावात नमुद केले होते. मात्र, हा प्रस्तावही लालफितीत अडकला.

  • इंदिरानगर बोगदा ते आर.डी. सर्कल दरम्यान गोविंद नगर रस्त्यावर नयनतारा सिटीसमोर ३० मीटर रस्त्याला जोडणारा १२ मीटर रस्ता रुंदीकरण केला जाणार होता, त्यासाठी महापालिकेकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या. मात्र, रस्ता रूंदीकरण होऊ शकले नाही.

स्थानिक वाहतुकीमुळेच सर्वाधिक कोंडी

इंदिरानगर, दीपालीनगर, राणेनगर या भागातील वाहतुकीबरोबरच नाशिकरोडमार्गे येणारी वाहने इंदिरानगर बोगदामार्गे पुढे जात असल्याने, त्यांचीच याठिकाणी अधिक वाहतुक कोंडी होते. सातपूर औद्योगिक वसाहतीत कामगार तसेच कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर असलेली मंडळी मोठ्या संख्येनी इंदिरानगर भागात वास्तव्यास आहे. याशिवाय सातपूर, त्र्यंबकरोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड याभागात असलेल्या शैक्षणिक संस्था अन्य महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये नोकरीस असणारेही इंदिरानगर या भागात वास्तव्यास आहेत. यासर्वांचा रोजचा मार्ग इंदिरानगर बोगदामार्गे असल्याने या चाकरमान्यांच्या वाहनांची याठिकाणी मोठी वर्दळ बघावयास मिळते. त्यामुळे सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत याठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ होत असल्याने, वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो.

शिर्डी ते त्र्यंबक व्हाया इंदिरानगर बोगदा

शिर्डीला साईबाबा चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला इतर जिल्ह्यातील किंवा परराज्यातील भाविक शक्यतो, त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येतोच. हा भाविक व्हाया इंदिरानगर बोगद्यामार्गे पुढे जात असल्याने, भाविकांच्या वाहनांचीही मोठी वर्दळ याठिकाणी नेहमीच बघावयास मिळते. याशिवाय पुणे येथून येणाऱ्या वाहनांना त्र्यंबक रोड, सातपूर किंवा गंगापूर रोड याभागात जायचे असल्यास त्यांना इंदिरानगर बोगदा हाच सोयीचा मार्ग ठरत असल्याने, त्यांचीही मोठी वर्दळ याठिकाणी असते. त्यामुळे देखील या वाहनांची मोठी कोंडी येथे बघावयास मिळते.

Nashik Latest News

नाशिक
Pudhari Special Ground Report Dwarka Chowk Nashik | सर्कल हटवले, भुयारी मार्गाचे काय?

बोगदा वनवे, तरीही मोठी कोंडी

इंदिरानगरमार्गे येणाऱ्या वाहनांसाठीच बोगदा खुला असला तरी, गोविंदनगरकडून इंदिरानगर तसेच मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांमुळेही याठिकाणी वाहतुक कोंडी होते. गोविंदनगरकडून येणाऱ्या वाहनांना जर इंदिरानगर किंवा पुढे नाशिकरोडला कनेक्ट व्हायचे असेल तर उड्डाणपुलाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडने डेटामॅटिक्स चौकाला वळण घेवून पुढे जावे लागते. तर मुंबईनाक्याकडे जाणाऱ्या वाहणांना मनोहर गार्डनला लागून असलेल्या सर्व्हिसरोडने पुढे जाता येते. परंतु यात बोगद्यातून येणारी वाहनेही सरळच पुढे येत असल्याने तिन्ही मार्गे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची येथे कोंडी होते. असाच कोंडीचा प्रकार बोगद्याच्या इंदिरानगर बाजुने होतो. मुंबई नाक्याकडून पाथर्डी फाट्याकडे जाणारी वाहने, तसेच इंदिरानगरकडून बोगदा मार्गे पुढे जाणारी वाहने एकाच वेळी येत असल्याने त्यांच्यात कोंडी होते. त्यामुळे याठिकाणी किमान सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुक पोलिसांची गरज भासतेच.

चार वाहतुक पोलिसांची गरज, नियुक्त मात्र दोनच

इंदिरानगर बोगदा येथील वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये किमान प्रत्येकी चार वाहतुक पोलिसांची याठिकाणी नेमणूक करणे गरजेचे आहे. मात्र, दोनच पोलिस याठिकाणी पाहरा देत असल्याने, त्यांना मोठी कसरत करावी लागते. वाहतुक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी यापूर्वी वारंवार मागणी केली गेली. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे याठिकाणी दोनच पोलिस नियुक्त केेले आहेत. सद्यस्थितीत सकाळी ८ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत दोन पाळ्यांमध्ये प्रत्येकी दोन पोलिस याठिकाणी नियुक्त आहेत. बोगद्यात वाहनांमुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात येत आहेे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची गेल्या शुक्रवारीच बैठक घेतली. कंत्राटदाराला बोलावून घेत बोगदा रूंदीकरणाचे कामे त्वरीत सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाळा असल्यामुळे इंदिरानगर बोगद्याचे काम सुरू व्हायला थोडा उशिर होऊ शकतो. मात्र, राणे नगर बोगद्याचे काम त्वरीत हाती घेतले जाईल. सिंहस्था अगोदर दोन्ही बोगद्याचे कामे मार्गी लावले जातील.

राजाभाऊ वाजे, खासदार.

इंदिरानगर बोगदा येथील वाहतुक कोंडीचा विचार करता, तत्काळ त्याठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यापूर्वी ज्या कामांना मंजूरी मिळाली आहे, त्यावर त्वरीत काम सुरू करायला हवे. उशिर होत असेल तर किमान सिग्नल यंत्रणा उभारावी.

सतीश सोनवणे, माजी नगरसेवक

गेल्या अडीच वर्षांपासून बोगद्यातील वाहतुक व्यवस्था बघत आहे. दररोज सात ते आठ तास खडा पहारा देवून वाहतुक सुरळीत ठेवावी लागते. एक मिनिट जरी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला, तर कोंडी होते. येथील वाहतुक कोंडीवर त्वरीत उपाययोजना करायला हवी.

व्ही. जी. भोईर, सहायक पोलिस उपनिरीक्षक.

बोगद्यात सीसीटीव्ही नसल्याने वन-वेचा फज्जा उडतो. बऱ्याचदा वाहतुक पोलिस नसल्याने, मोठी कोंडी होती. यातून वाहनधारकांमध्ये बाचाबाची होते. बऱ्याचदा त्याचे पर्वसन हानामारीत होते. त्यामुळे बोगद्याचा प्रश्न लवकर निकाली काढायला हवा.

रमीज पठाण, नागरिक.

बोगद्याच्या दोन्ही बाजुने असलेल्या सर्व्हीस रोडवर स्पीडब्रेकर बसविले असले तरी, मुंबईकडे जाणारी किंवा मुंबई नाक्याकडे येणारी वाहने वेगाने येत असल्याने, येथे अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. सिग्नल नसल्याने वाहने कुठून येतात, काहीच कळत नाही. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड होते.

सर्जेराव चव्हाण, रिक्षाचालक.

वाहन कोंडीचा प्रचंड त्रास होत असून, दुकानात ग्राहकही येण्यास टाळाटाळ करतात. बोगद्याचे रूंदीकरण केल्यास वाहन कोंडीचे प्रमाण कमी होईल. पादचाऱ्यांनाही त्रास होणार नाही. वाहन कोंडीचा परिसरात व्यापार, व्यवसायावर परिणाम होत असल्याने, त्यातून त्वरीत मार्ग काढायला हवा.

रामकृष्ण पवार, दुकानदार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news