TCS Nashik Case pudhari photo
नाशिक

TCS Nashik Case| निदा खानचा जामीन अर्ज फेटाळला

nida khan | अटकेची टांगती तलवार कायम; उच्च न्यायालयात मागणार दाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी शनिवारी (दि. २) फेटाळला. त्यामुळे निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. गेल्या २७ एप्रिलला निदाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावेळी न्यायालयाने अंतरिम निकाल राखून ठेवला होता. सरकारी पक्ष आणि तपास अधिकाऱ्यांच्या मुद्द्यांचा विचार करत न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला.

निदा खान गरोदर असल्याने तिला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. २७ एप्रिलच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी अनेक धक्कादायक बाबी न्यायालयासमोर मांडल्या होत्या. निदा खान आणि इतर आरोपींनी पीडितेला धर्म परिवर्तन करण्यासाठी बुरखा दिला होता. मोहम्मद पैगंबर यांचे मुस्लीम धर्माची माहिती असलेली पुस्तके दिली होती. निदाने पीडितेला पाठवलेल्या धार्मिक शिकवण देणाऱ्या यू ट्यूब लिंक, इंस्टाग्राम लिंक, रील्स तसेच व्हिडिओ तिला कुठून मिळाले याबाबतचा तपास बाकी असल्याचे सांगितले होते.

निदा खान पीडितेला धार्मिक शिकवण देण्यासाठी फिर्यादीला घरी घेऊन जात असे. तिच्याकडून नमाजपण, हिजाब व बुरखा कसा परिधान करावा याची शिकवण देत होती. तिने व इतर आरोपींनी हा गुन्हा संगनमत करत केलेला असून, यातील संशयित दानिश शेखने फिर्यादीची शैक्षणिक व इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेत नावात बदल करणार होते. त्यामुळे निदाकडून मालेगाव पार्टीबाबतचा तपास करणे बाकी असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. बचाव पक्षाने, धर्मांतरणाचा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे जर कायदाच नसेल, तर तो गुन्हा कसा ठरू शकतो, असा सवाल उपस्थित केला. याशिवाय फिर्यादीत धर्मांतरणाबाबत कोणताही उल्लेख नसल्याचे सांगताना, सर्वोच्च न्यायालयातील काही निवाडे सादर केले होते. दरम्यान, न्यायालयाने सरकारी पक्ष व तपास अधिकाऱ्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

"निदा खानचे कुटुंबीय उच्च न्यायालयात जाणार आहे. गुन्ह्याची गंभीरता पाहून न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असावा. न्यायालयाकडून निकाल मिळताच आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत."
- अॅड. राहुल कासलीवाल, निदा खानचे वकील
"गुन्ह्यात तपासाची व्याप्ती बघता तिचा ताबा आवश्यक असल्याने निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तिची अटक झाल्यानंतर तपासात तिची या प्रकरणातील भूमिका स्पष्ट होणार आहे."
- अजय मिसर, विशेष सरकारी वकील

कोणत्याही क्षणी अटक

टीसीएस प्रकरणात नाव समोर आल्यापासून निदा खान फरार आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरवेळी ती पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाली आहे. आता न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने कोणत्याही क्षणी तिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT