

नाशिक : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण व जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी (दि. २७) पूर्ण झाली.
नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांनी या अर्जावरील निकाल २ मे पर्यंत राखून ठेवला असून, तोपर्यंत निदा खानवरील अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी दानिश ईजाज शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार या दोघांना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणातील महत्त्वाची संशयित म्हणून निदा खान अद्याप फरार आहे.
तपासादरम्यान या गुन्ह्यात अॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लागू करण्यात आल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. सुनावणीदरम्यान निदा खानच्या वतीने अँड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद करीत गरोदरपणाचा मुद्दा मांडत अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची मागणी केली. त्यांनी धर्मांतरासंदर्भात स्वतंत्र कायदा नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच एकाच कालावधीतील आणि एकाच ठिकाणी घडलेल्या घटनांसाठी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची गरज नसल्याचे सांगितले.
प्रमुख संशयितांपैकी निदा खान एक
टीसीएस कंपनीतील महिला शोषण व कथित धमांतर प्रकरणात निदा खान हिच्यावर गंभीर आरोप असून, ती प्रमुख संशयित आरोपींपैकी एक आहे. विशेष तपास पथकाकडून तपास सुरू असून, ती सध्या फरार आहे. महिला कर्मचाऱ्यांवर धार्मिक सक्ती, रोजा पाळण्यास भाग पाडणे, तसेच जातिवाचक अपमान केल्याचे आरोप तिच्यावर आहेत. लैंगिक शोषणाशी संबंधित तक्रारींमध्येही तिचे नाव समोर आले आहे. हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप आहे. तपासात मालेगाव व मलेशियाशी संबंधित आर्थिक दुवे उघड झाले आहेत.