नाशिक

Nashik News : देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज, दिला ‘हा’ इशारा

गणेश सोनवणे

देवळा(जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा -देवळा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी( दि. १४ ) काळ्या फिती लावून कामकाज सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दि. १८ डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देवळा येथील कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर आहेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकाचा आशय असा कि, महाराष्ट्र्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० मार्च रोजी मुंबईत घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती मधील प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले होते. मात्र त्या निर्णयांची अंमलबजावणी वित्त विभाग, नगरविकास विभाग आणि संचालक कार्यालयामध्ये अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न गेल्या ८ महिन्यात अनेकवेळा संबंधीत अधिकारी यांचेसमवेत चर्चा झाल्या तरी देखील प्रश्न अनुत्तरीत राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दि. ३०/१०/२०२३ ते दि. ०३/११/२०२३ या कालावधीत आमरण उपोषण केले. या अनुषंगाने बैठकीमध्ये प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. परंतु इतिवृत्त पूर्णतः चुकीचे -वस्तुस्थितीला धरून नसल्यामुळे सदरहू प्रश्न अनुत्तरीत राहील्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दि. १४ पासून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज सुरु केले आहे. याची दखल न घेतल्यास पेन्शनसह इतर सर्व प्रलंबित मागण्यांसाठी सर्व कर्मचारी सोमवार दि. १८ डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करणार आहेत असा इशारा दिला आहे.

या आंदोलनात देवळा तालुका अध्यक्ष सुधाकर आहेर, उपाध्यक्ष सुरेश आहेर, किरण गुजरे, सचिव वसंत आहेर, शशिकांत मेतकर, विकास आहेर, सतीश साळुंखे, दीपक गोय , संगीता सोंनगत, कांचन गोयल, विमल देवरे, सुशीला घोडेस्वार आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT