शिरूर शहरासाठी सत्तर कोटींची पाणी योजना | पुढारी

शिरूर शहरासाठी सत्तर कोटींची पाणी योजना

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या सत्तर कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता देऊन त्याचा शासन निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.13) नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान हा शासन निर्णय सोपवत आनंदाची बातमी दिल्याची माहिती शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. शिरूरची बहुप्रतीक्षित पाणी योजना मंजूर व्हावी, यासाठी गेली तीन वर्षे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता.

संबंधित बातम्या :

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांचे दालनात आयोजित बैठकीत याविषयी आग्रही मागणी केल्यानंतर या कामाला विशेष गती आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्वीची आखलेली योजना कमी क्षमतेची असल्याने त्यामध्ये वाढ करून नव्याने प्रतिमाणसी 135 लिटरप्रमाणे पाणीपुरवठा होणारी योजना अद्ययावत करण्यास आढळराव पाटील यांना यश आले.

या योजनेबाबत माहिती देताना आढळराव पाटील म्हणाले, की शिरूरच्या नागरिकांना दररोज पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यक्तिशः भेट घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून दिले. नगरपरिषद प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे गेली वर्षभर सतत संपर्कात राहून योजनेतील त्रुटी दूर करत राज्याच्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करून घेतले. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे व सहकार्‍यांनी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी चांगली मेहनत घेतली. शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा शासन निर्णय आज पारित झाला आहे. शिरूर शहरातील सन 2050 पर्यंतच्या लोकसंख्येला उपयुक्त ठरेल अशा या योजनेमुळे येथील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान वाटत असल्याची भावना या वेळी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. शहरातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली योजना मंजूर केल्याबद्दल सर्व स्तरांतून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार व्यक्त होत आहे.

पाणी योजनेची वैशिष्ट्ये
घोड धरणातून सुमारे 9.31 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित होऊन ऐन उन्हाळ्यातही नागरिकांना पाण्याची उणीव भासणार नाही. या योजनेत जलशुद्धीकरण प्रकल्पासह आधुनिक प्रक्रिया प्रकल्पाव्दारे स्वच्छ पाणी मिळणार आहे. संपूर्ण शहरातून जलवाहिनी वितरित होऊन प्रतिमाणसी 135 लिटरप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. पुढील दीड वर्षात ही पाणी योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नगरपरिषदेकडून निश्चित करण्यात आले आहे.

Back to top button