नाशिक

नाशिक : मनपा नोकरभरतीचा बार दिवाळीनंतरच

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, नोकरभरती प्रक्रियेसाठी मंजूर पदांच्या संवर्गनिहाय परीक्षेच्या स्वरूपासंदर्भातील अहवाल महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसला पाठविला आहे. टीसीएसमार्फत या अहवालाची छाननी करून त्यास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता महापालिकेतील नोकरभरतीचा बार आता दिवाळीनंतरच उडेल, हे स्पष्ट झाले आहे.

नाशिक महापालिकेची आठ वर्षांपूर्वी 'क' संवर्गातून 'ब' वर्गात पदोन्नती झाली असली तरी महापालिकेचे मंजूर आस्थापना परिशिष्ट पूर्वीच्या 'क' संवर्गानुसार आहे. त्यानुसार महापालिकेत ७०९२ पदे मंजूर असली तरी, सध्या यातील तीन हजार पदे ही सेवानिवृत्ती, स्वेच्छा निवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या नवीन आकृतिबंधाची तयारी पालिकेकडून सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना काळात राज्यशासनाने क संवर्गातील परिशिष्टानुसार तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय विभागाची ७०६ पदांना भरतीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिली होती.

शासन निर्देशांनुसार महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएसला काम देण्यात आले आहे. ब ते ड संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाऊ शकते. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता उर्वरित ६२४ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी महापालिका आणि टीसीएसमध्ये कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी संवर्गनिहाय परीक्षेचे स्वरूप कसे असावे यासंदर्भातील माहिती टीसीएसने महापालिकेकडून मागविली होती. त्यासंदर्भातील अहवाल प्रशासनाने टीसीएसला पाठविला आहे. आता प्रत्यक्ष नोकरभरतीची प्रक्रिया दिवाळीनंतरच सुरू होऊ शकेल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

प्रतिउमेदवार ६७५ रुपयांपर्यंत शुल्क आकारणार

या भरतीप्रक्रियेसाठी टीसीएस कंपनी ४९५ ते ६७५ रुपये प्रतिउमेदवार आकारणार आहे. भरतीप्रक्रियेत १० हजारापर्यंत उमेदवार आले, तर एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबादला कंपनी घेणार आहे. १० हजार ते ५० हजारादरम्यान उमेदवार आले तर एका उमेदवारासाठी ६०० रुपये, ५० हजार ते एक लाखापर्यंत उमेदवार आले तर, प्रतिउमेदवार ५७५ रुपये, एक ते दोन लाखांपर्यंत ५५० रुपये दर आकारले जातील. तर दोन लाख ते पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास प्रतिउमेदवार ४७५ रुपये मोबदला द्यावा लागणार आहे. उमेदवारांकडूनही अर्ज-परीक्षा शुल्क आकारले जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडले जाणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT