Shubman Gill : टीम इंडियाला जबर धक्का, शुभमनच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर | पुढारी

Shubman Gill : टीम इंडियाला जबर धक्का, शुभमनच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी गिल रविवारी भारतीय संघासोबत दिल्लीला आला नाही, तो चेन्नईतच उपचार घेत आहे. त्याच्या प्लेटलेटची संख्या कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप मधील पहिला सामना जिंकला असला तरी भारतीय संघाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुभमन गिलच्या आजारामुळे संघाची डोकेदुखी वाढल्याचे दिसते. पहिल्याच सामन्याला मुकलेला शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातदेखील खेळणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. ‘बीसीसीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळू न शकलेला सलामीवीर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यालादेखील मुकणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ तारखेला दिल्लीत सामना होणार आहे.

गिल चेन्नईतच राहणार असून, वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. गिल डेंग्यूने ग्रस्त असून त्यांच्या रक्तात प्लेटलेटचे प्रमाण कमी झाले आहे. त्याला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.

गेल्या वर्षभरात भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला गिल सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा मोठा भाग असेल अशी अपेक्षा होती. तथापि, चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या सलामीच्या सामन्यापूर्वी डेंग्यूमुळे तो खेळू शकत नाही. शिवाय १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या भारताच्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात शुभमनच्या सहभागावरही शंका निर्माण झाली आहे.

गिलच्या अनुपस्थितीत इशान किशन पुन्हा एकदा रोहित शर्मासोबत डावाची सलामी देईल अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. चेन्नईमध्ये २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला माघारी परतावे लागणार होते, परंतु विराट कोहली आणि केएल राहुलने संघाला विजय मिळवून दिला.

Back to top button