नाशिक

Nashik Ganpati Visarjan : नाशिककरांचा लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, 'नभी फडकणारी भगवी पताका', 'पारंपारिक ढोलताशाच्या साथीला डीजेचा दणदणाट', 'क्षणाक्षणाला गणेशभक्तांचा वाढता उत्साह'व 'एक, दोन, तीन चार गणपतीचा जयजयकार' करत नाशिककरांनी गुरूवारी (दि. २८) लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. भक्तांनी साश्रुनयनांनी गणरायाला निरोप देतानाच 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे आर्जव केले. पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन आणि गणेश मंडळांच्या सहकार्यामुळे यंदाच्या वर्षी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूका वेळेत पार पडल्या. (Nashik Ganpati Visarjan)

घरोघरी दहा दिवसांच्या पाहुणचार घेतल्यानंतर गणराय त्यांच्या गावाला परत गेले. शहरातील द्वारका येथील वाकडी बारव येथे दुपारी बारा वाजता पालकंमत्री दादा भुसे यांच्याहस्ते मानाच्या गणेशाचे पूजन करून विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. ना. भुसे यांनी ढोल वादनाचा आनंद लुटताना टाळ-मृदुंगाच्या तालावर फेर धरला. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड यांच्यास‍ह गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Nashik Ganpati Visarjan)

संबधित बातम्या :

पंचवटीमधील रामकुंड, गोदाघाट परिसर, तपोवन परिसर, नवश्या गणपती, घारपुरे घाट आदी ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी झाली. नाशिकराेडला वालदेवी तसेच दारणा काठावरही गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. दरम्यान, सायंकाळनंतर नाशिककर सहकुटूंब मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडले. पारंपारिक मार्गावरून ही विसर्जन मिरवणूक जशी-जशी पुढे सरकत होती, तसा नागरिकांचा उत्साह शिगेला पाेहचला. मिरवणूक मार्गावर सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायाला मिळाले. मिरवणूकीमधील शेवटच्या गणेशाचे रात्री एक वाजेच्या सुमारास गोदाघाटावर विसर्जन (Nashik Ganpati Visarjan) करण्यात आले.

हे मंडळ सहभागी 

विसर्जन मिरवणूकीत २० मंडळे सहभागी झाले. मिरवणूकीच्या अग्रभागी नाशिक महापालिका व रविवार कारंजा मित्रमंडळाचा (चांदीचा गणपती) चित्ररथ होता. त्यानंतर गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), पेठरोडचे श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळ (मानाचा राजा), युवक मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती, चौक मंडई, नेहरू चौक मित्रमंडळ पिंपळपार, वेलकम सहकार्य मित्रमंडळ, गणेश मूकबधिर मित्रमंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठाण, गजानन मित्रमंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाऊंडेशन, उत्कर्ष मित्रमंडळ नाईकवाडीपुरा या क्रमाने मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले.

डीजेला मुकसंमती

यंदाच्या वर्षी मिरवणूकीत विविध मंडळांमध्ये डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. पालकंमत्री दादा भुसे यांना डीजेबद्दल विचारले असता आवाजाच्या मर्यादेत डीजेला परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांकडून डीजेला परवानगी दिलीच नसल्याचे समजते आहे. त्यामुळे कोणाच्या मुकसंमतीने डीजे वाजविण्यात आला, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. असे असले तरी किमान दहा वर्षांनी मिरवणूकीत डीजेचा आवाज घुमल्याने नाशिककरांनी त्याच्या तालावर मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला.

थैय्याम कलाकारांचे आकर्षण

शिवसेनाप्रणीत शिवसेना मित्रमंडळाने यंदाही मिरवणूकीतील आपले वेगळेपण जपले. मंडळाने केरळ येथील त्रिशुल गावामधील थैय्याम कलाकारांना पाचारण केले. या कलाकारांनी विविध श्री गणेश, भगवान शंकर, मारूती, कालीमाता, महालक्ष्मी असे विविध देवदेवतांचे रुपे साकार केली. या कलाकारांना नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. गुलालवाडी व्यायामशाळेचे पारंपारिक लेझीम पथकही मिरवणूकीतील आकर्षण ठरले.

ढोलपथकांची मुजाेरी कायम

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या मिरवणूकीतही ढोल पथकांची मुजोरी कायम असल्याचे पाहायला मिळाले. ढोलपथकांनी चार-चारच्या रांगा करतानाच दोऱ्या लावत विसर्जन मार्ग व्यापून टाकला. त्यामुळे मिरवणूकीसाठी आलेल्या भावीकांना नाहक त्रास सहन करावा लागला. विशेष करून गाडगे महाराज पुतळा ते रेडक्रॉस सिग्नल या भागात रस्ता अरूंद असतानाही ढोल-पथकांनी त्यांची मुजोरी कायम ठेवल्याने महिला भाविकांसह बालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT