नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवित तब्बल ७५ लाख ९ हजार ६६२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार शहरातील सायबर पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ सप्टेंबर २०२५ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक तसेच फोन व इंटरनेटच्या माध्यमातून हा प्रकार घडला. संशयितांनी विविध मोबाइल क्रमांकांचा वापर करून फिर्यादी व साक्षीदारांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना 'वेल्थ डिस्कशन' नावाच्या २३ ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले होते.
या ग्रुपच्या माध्यमातून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. संशयितांनी वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी पैसे भरण्यास सांगितले होते. त्यानुसार फिर्यादीने संशयितांच्या सांगण्यावरून ऑनलाइन पद्धतीने एकूण ७५,०९,६६२ रुपये जमा केले होते.
मात्र, अपेक्षित परतावा मिळाला नसल्यामुळे तसेच संशयितांकडून संपर्क टाळला जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात संशयितांनी वापरलेल्या मोबाइल क्रमांकांची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित व्यक्तींनी वेगवेगळ्या नावांनी किंवा ग्रुपच्या माध्यमातून फिर्यादीशी संवाद साधण्याची शक्यता पोलिसांनी तपासात गृहीत धरली आहे. ऑनलाइन गुंतवणुकीपूर्वी संबंधित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची अधिकृतता तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी (दि. ६) सायंकाळी या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात केली. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस उपायुक्त, गुन्हे, नाशिक शहर यांची परवानगी घेतली. पोलिसांकडून संबंधित मोबाइल क्रमांक, ऑनलाइन व्यवहार, बँक खात्यांची माहिती तसेच 'वेल्थ डिस्कशन' ग्रुपची माहिती तपासली जात आहे. फसवणुकीची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळती झाली, याचाही शोध घेतला जात आहे. संशयितांचा माग काढण्यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असून, या प्रकरणातील आरोपी लवकरच निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
'डिजिटल अरेस्ट' करून ४१ लाखांचा गंडा
'तुमच्या नावाने मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाले असून, तुमच्यावर कारवाई होऊ शकते,' अशी धमकी देत सायबर भामट्यांनी इंदिरानगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, संशयितांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तीन दिवस घरातच कॅमेऱ्यासमोर बसवून ठेवले. या काळात त्यांच्यावर मानसिक दबाव आणून ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळण्यात आले.
तीन दिवस मानसिक कोंडी
सायबर भामट्यांनी सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडून, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचे भासवले. परिणामी, तीन दिवस कुटुंबांशी मोकळेपणाने संवाद साधता न आल्यामुळे मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित ज्येष्ठ नागरिक मल्टिनॅशनल कंपनीतून निवृत्त झाले आहेत. शनिवार (दि. ३) ते सोमवार (दि. ५) या कालावधीत हा प्रकार घडला. संशयितांनी फोनद्वारे संपर्क साधत त्यांच्या नावाने मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाल्याचे सांगितले. त्यानंतर चौकशी आणि कारवाईची भीती दाखवत त्यांना कोणाशीही संपर्क साधू नये, अशा सूचना दिल्या.
घरातून बाहेर पडू नये तसेच सतत कॅमेऱ्यासमोर बसून राहण्यास सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या सांगण्यानुसार वेगवेगळ्या खात्यांवर तब्बल ४१ लाख रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. शेवटी मुदतठेव अर्थात एफडीदेखील मोडून पैसे देण्याचा दबाव त्यांच्यावर आणण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी मुलीला माहिती देताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि पुढील मोठे आर्थिक नुकसान टळले.