

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक मनपा हद्दीत वादळी वारा, अतिवृष्टी, मुसळधार पाऊस अथवा अन्य नैसर्गिक व अनपेक्षित कारणांमुळे झाडे उन्मळून पडून नागरिकांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास मनपाकडून भरपाई दिली जाणार आहे. या संदर्भातील धोरण निश्चितीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मनपाकडून वृक्षसंवर्धन, वृक्षछाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण व उपाययोजना केल्या जातात. मात्र, अनेकदा वादळामुळे झाडे अथवा फांद्या रस्त्यावर, वाहनांवर किंवा नागरिकांवर पडण्याच्या घटना घडतात.
यात नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवते. दुखापत झालेल्या नागरिकांना उपचाराचा आर्थिक भार सहन करावा लागतो. काही प्रकरणांत कायमस्वरूपी अपंगत्वाची शक्यता असते.
अशा दुर्घटनांत पीडितांना आर्थिक भरपाई देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण असावे, अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे समान स्वरूपाच्या घटनांत एकसमान निकष आणि कार्यपद्धती राहण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र धोरण निश्चित करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी जादा विषयात मांडला होता. या धोरणानुसार मृत्यू किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींची पडताळणी करून मनपाच्या निधीतून नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे.
मनपाने घेतला कायदेशीर सल्ला:
लेखा विभागाच्या अभिप्रायानंतर पॅनेलवरील वकील रेवती कोतवाल यांचा सल्ला घेण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात झाडामुळे झालेल्या अपघाती मृत्यू किंवा दुखापतीसाठी आर्थिक मोबदला देण्याची विशिष्ट तरतूद नसल्याचे कायदेशीर सल्ल्यात स्पष्ट करण्यात आले. मात्र, मानवतेच्या दृष्टिकोनातून आर्थिक भरपाई देण्याबाबत धोरण निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
चार प्रकरणांचा आधार:
या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर राहुल देशमुख यांची २ जुलै २०२५ रोजी प्राप्त नोटीस तसेच सिद्धार्थ आढव, प्रणव तुषार पवार आणि नीलेश अशोक जोशी यांनी २०२६ मध्ये केलेल्या अर्जाचा संदर्भ देण्यात आला आहे. या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील दुर्घटनांसाठी कायमस्वरूपी धोरण करण्याची गरज प्रशासनाने अधोरेखित केली होती.