

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के शाळा सुस्थितीत असल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यातील शाळांची दुरवस्था समोर आली आहे. जिल्ह्यातील ३ हजार २८२ शाळांपैकी तब्बल ८२६ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत, तर ६८२ नवीन खोल्यांची तातडीने गरज आहे. दुरुस्तीसाठी २४ कोटी आणि नवीन वर्गखोल्यांसाठी ६८ कोटींच्या निधीची मागणी शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे.
'सीजेपी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या भीषण वास्तवावर प्रकाश पडला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ३ हजार २८२ शाळा असून, यात २ लाख ५३ हजार ६७८ विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, सध्या या शाळांमधील ८२६ वर्गखोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, काही ठिकाणी छताचे प्लास्टर पडणे, भिंतींना तडे जाणे, तर काही ठिकाणी गळतीचे प्रकार घडत आहेत.
यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उघड्यावर किंवा धोक्याच्या सावटाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. वाढती विद्यार्थीसंख्या आणि जुन्या झालेल्या वास्तू लक्षात घेता, शाळांकडून जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडे ६८२ नवीन वर्गखोल्यांची मागणी नोंदवली आहे.
वर्गखोल्यांच्या अभावी अनेक ठिकाणी दोन ते तीन वर्ग एकाच खोलीत भरावे लागत असून, यामुळे गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. सुरगाणा तालुक्यातील शाळांमधील वर्गखोल्या सर्वाधिक नादुरुस्त असून, येथून सर्वाधिक ८९ वर्गखोल्यांची मागणी केली आहे. पेठ ५२, त्र्यंबकेश्वर ६९, इगतपुरी ६३, मालेगाव ६२ येथे नादुरुस्त वर्गखोल्यांची संख्या मोठी आहे.
९२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव:
शाळांची अवस्था सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या असून, जिल्हा नियोजन समितीकडे निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात खोल्या दुरुस्तीसाठी २४ कोटी ७८ लाख, नवीन वर्गखोल्यांसाठी ६८ कोटी १९ लाख अशा एकूण ९२.९७ कोटी रुपयांची मागणी केली आहे.