नाशिक

नाशिक : …अन् नवरदेवाने घेतला हातात झाडू

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मालेगावकडून केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमास मालेगाव तालुक्यात उत्साहात सुरुवात झाली. या उपक्रमाचा भाग म्हणून मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे धार्मिकस्थळांची स्वच्छता हा श्रमदान उपक्रम रोकडोबा मंदिर परिसरात राबविला. ग्रामपालिका दाभाडी येथील ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी या ठिकाणी स्वच्छता करून श्रमदान केले. यामध्ये नुकतेच विवाह ठरलेले युवक निखिल शेवाळे हे पाटणे येथील रहिवासी हे दर्शनासाठी आले होते. सर्व ग्रामस्थ हे मंदिर परिसरात स्वच्छता करत असल्याचे बघून त्यांनी स्वयंस्फूर्तीने अंगात नवरदेवाचा साज असताना स्वतः हाती झाडू घेऊन साफसफाई केली आणि कचरा गोणीत भरला.

दरम्यान, त्यांची ही कृती बघून परिसरातील ग्रामस्थ आणि दर्शनासाठी येणारे भाविक यांनी समाधान व्यक्त केले. सर्व ग्रामस्थांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. निखिल यांनी स्वच्छता ही काळाची गरज असून, प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे मत याप्रसंगी व्यक्त केले. त्यांच्या या स्वच्छता उपक्रमाचे मालेगाव गटविकास अधिकारी भरत वेन्दे यांनी विशेष अभिनंदन केले असून, अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी भाविक, नाशिक जिल्हा परिषदेचे रवींद्र बराथे, पंचायत समिती येथील ललित शेलार, मोहन वाघ, मयूर पाटील, दीप गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT