सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
खरातचा आणि माझा काही संबंध असल्यास ते पोलिस चौकशीत समोर येईल. त्यात मी दोषी आढळलो तर पोलिस माझ्यावर जी कारवाई करतील तिला सामोरे जायला मी समर्थ आहे. उदय सांगळे यांच्यासारख्या बरबटलेल्या माणसावर बोलण्यात मला रस नसल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
खरातच्या संस्थानचा विकास आमदार कोकाटे यांच्या कार्यकाळातच झाला असल्याचे वक्तव्य भाजप युवा नेते उदय सांगळे यांनी नगरसेवक पंकज जाधव यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केले होते. यावर आमदार कोकाटे यांनी संताप व्यक्त केला.
भोंदू खरात याच्या संस्थानचा विकास हा कुणाच्या कृपाशीर्वादाने झाला हे सिन्नरच्या जनतेने बघितले आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी सांगळे यांच्यावर आरोप केले असतील तर त्यांना उत्तर द्यायचे सोडून माझ्यावर ते आरोप करत मूळ प्रश्नांना बगल देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
याचा अर्थ खरातसोबत असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधांबाबत ते स्वतः शिक्कामोर्तब करत आहेत. दारणा नदीतून मिळालेले पाणी हे कुणाच्या कृपाशीर्वादाने मिळाले हे सिन्नरकर जाणतातच. मात्र, त्याचबरोबर इतर कामे कुणाच्या शिफारसीने झाली हेदेखील सिन्नरकर जाणतात. माझी खरातसंदर्भात एकही शिफारस कुठल्याही कामाला नाही.
मात्र, त्यांनी जादूचे प्रयोग करून स्वतःच्या अघोरी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले सिन्नरकरपासून लपून राहिलेले नाही. म्हणून ह्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मुळात मी पुरोगामी विचाराचा आहे हे युवक काँग्रेसच्या काळापासून संपूर्ण जिल्ह्याने बघितले आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या आयुष्यात त्यांचा तालुक्यात 'उदय' होणार नाही, असा टोलाही त्यांनी मारला.
... म्हणून उपकार केले नाहीत
कबड्डी स्पर्धेच्या क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव दिले म्हणजे त्यांनी उपकार केले नाहीत. क्रीडा खाते आजही राष्ट्रवादीकडेच आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळेच त्यांनी अजितदादांचे नाव प्रवेशद्वाराला दिले असल्याचे सर्वांना समजते. त्यामुळे सांगळे यांनी फुकटचा आव आणू नये असा इशारा आ. कोकाटे यांनी दिला.