

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने अत्यंत धक्कादायक वळण घेतले असून, या प्रकरणातील तपासात नवनवीन गंभीर बाबी उघड होत आहेत. महिलांची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण करण्यासाठी आरोपीने वापरलेली पद्धत ऐकून समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांनी खरातला मदत केल्याचा संशय निर्माण झाल्याने तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे.
एका डॉक्टरचा राजकीय पार्श्वभूमीशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. दुसरा डॉक्टर पंचवटी परिसरातील नामांकित वैद्यकीय व्यावसायिक असल्याची चर्चा आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतःला धार्मिक शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती असल्याचे भासवून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे.
तो महिलांना 'माझ्यामध्ये देवीची शक्ती येते, ती तुझ्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी तुला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील' असे सांगत असे. तुझ्यातील दोष मोठा आहे. त्यामुळे अनेक वेळा संबंध ठेवावे लागतील, असा मानसिक दबाव निर्माण करत तो महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे उघड झाले आहे.
हीच त्याची ठरलेली 'मोडस ऑपरेंडी' असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शोषणानंतर संबंधित महिला गर्भवती होऊ नये यासाठी त्यांना गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे. या औषधांचा पुरवठा डॉक्टरांच्या सल्ल्याने होत असल्याचा संशय असून, या प्रकरणात दोन डॉक्टरांची नावे तपासाच्या कक्षेत आली आहेत.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, अशोक खरात याचे काही शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, डॉक्टर आणि बांधकाम व्यावसायिक यांच्याशी निकटचे संबंध होते.
लवकरच संबंधित डॉक्टरांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातही व्यवहार
रिअल इस्टेट क्षेत्रातही त्याचे मोठे व्यवहार असल्याचे समोर आले आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे १५०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपत्तीमागे हवाला व्यवहार, शासकीय कागदपत्रांचा गैरवापर आणि इतर बेकायदेशीर व्यवहारांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात मदत करणाऱ्या सर्व संबंधितांना पोलिसांनी चौकशीच्या कक्षेत घेतले आहे.