नाशिक

नाशिकमध्ये साकारलेली हनुमान चालिसा निघाली सिंगापूरला

गणेश सोनवणे

संगणकाच्या युगातही सुंदर हस्ताक्षराचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही, याची प्रचिती नाशिकच्या सुलेखनकार पूजा नीलेश यांच्या निमित्ताने आला. त्यांनी हस्तलिखिताद्वारे १० बाय ५ साइजच्या कॅनव्हासवर रेखाटलेल्या नेत्रसुखद हनुमान चालिसेस कलाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातून ही रचना सिंगापूरमध्ये पाेहोचली आहे.

सुलेखनाचे आद्य व प्रधान उद्दिष्ट म्हणजे नेत्रसुखदता होय. अक्षरे डोळ्यांना सुंदर दिसली पाहिजे, हे आद्य प्रयोजन तत्त्व आणि ते साधण्यासाठी सुवाच्चता, सुस्पष्टता हे लेखनाचे मूळ गुणधर्म. पौर्वात्य लिपी वाचू न शकणार्‍या दर्शकालाही त्या लिपीतले अक्षरसौंदर्य मोहून टाकते. असाच सुलेखन आविष्कार पूजा यांनी केला आहे.

त्रिपुरा येथे रामसेतू नावाचे कलाप्रदर्शन भरविले गेले होते. त्यावेळी पूजा यांनी मांजरपाटावर हनुमान स्तोत्राचे सुलेखन केले. ते त्रिपुरा-अगरताला येथे मुरारी बापू यांच्या रामकथा कार्यक्रमात भेट देण्यात आले. त्यानंतर सिंगापूरहून त्यांना कलाकृतीसाठी मागणी आली. इतर कुठल्याही माध्यमापेक्षा कापडावर ब्रशच्या सहाय्याने लिहिणे फार अवघड गोष्ट असते. त्यानुसार पूजा यांनी अ‍ॅक्रिलिक कलर्स आणि ब्रशचा वापर करत तब्बल सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीत कॅनव्हासवर हस्तलिखित हनुमान चालिसा साकारली, जी नाशिकच्या पुण्यनगरीहून थेट सिंगापूरस्थित असलेल्या राजेश राव यांच्या घरी थाटात झळकणार आहे. या संपूर्ण कार्यात त्यांना त्यांचे पती सुलेखनकार व इंटेरिअर डिझाइनर नीलेश गायधनी व चित्रकार केशव कासार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

माझ्या घरात श्री हनुमान चालिसा हे स्तोत्र लावायचे होते. विशेषकरून कुणी हस्तलिखित स्वरूपात लिहून देईल याच्या शोधात होतो. त्याच वेळी पूजा नीलेश यांच्याबद्दल कळले. त्यांचे अद्वितीय काम पाहून मी भारावून गेलो. सुलेखनातून लिहिलेले स्तोत्र पाहून खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. – राजेश राव, सिंगापूर

सुलेखनात पूजा नेहमीच नवनवीन प्रयोग आणि माध्यमे वापरत असते. याआधीही तिने 2'×10′ पेपरवर दोन दिवस आणि दोन रात्र शिवतांडव स्तोत्र लिहिले होते. त्याची दखल दिवंगत सुलेखनकार कमल शेडगे यांनी घेतली होती. सातत्याने कॅलीवाॅल, पेंटिंग्जही करत असते. २०२१ मध्ये सुलेखनातील "ओम" हा नेदरलँडला गेला होता. आता हनुमान चालिसा सिंगापूरला जातेय. मेहनत आणि सातत्य फळाला आली. – नीलेश गायधनी, इंटेरिअर डिझाइनर आणि सुलेखनकार

सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी ही माझी साधना आहे. अक्षरांच्या सानिध्यात राहायला आवडतं. ब्रशच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांवर सुलेखन प्रयोग करायला आवडतात, अक्षरानुभूतीचा आनंद रिफ्रेश करून रिजूव्हनेइट करणारा असतो . – पूजा नीलेश, सुलेखनकार

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT