नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील सर्व नागरीकांना दर्जेदार व किफायतशीर दरात सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. आरोग्य विद्यापीठामार्फत उभारण्यात आलेले देशातील पहिले 'सेंटर आॉफ एक्सलन्स' उत्कृष्ठता केंद्र यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
आरोग्य विद्यापीठातील सेंटर आॉफ एक्सलन्स' केंद्राचे उद्घाटन मुश्रीम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कोयता फाऊंडेशनचे अभिषेक गोपालका उपस्थित होते. केंद्रीय निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल, केंद्र शासनाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सुद, आय.सी.एम.आर.चे डायरेक्टर जनरल डॉ. राजीव बहल, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीचे सेक्रेटरी डॉ. राजेश गोखले, नॅशनल मेडिकल कमिशनचे चेअरमन डॉ. बी.एन. गंगाधर हे दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते. याचबरोबर डॉ. प्रशांत औटी, रिझवान कोयटा व सुरभी गोयल, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेचे डॉ. निशांत जैन व कनुप्रिया गुप्ता उपस्थित होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले की, डिजिटल लर्निंग स्टुडीओद्वारे ऑनलाइन अध्यापन आणि शिक्षणाचे संरेखन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद, विचार कौशल्य सक्रिय शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वयंनिर्देशित शिक्षण करण्याची क्षमता आहे. एन्क्युबेशन सेंटरद्वारे आरोग्य क्षेत्रातील परिवर्तनासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. फॅकल्टी डेव्हलमेंट अकादमीमार्फत प्रशिक्षण आणि समन्वयन केंद्र म्हणून क्लिनिकल, व्यवस्थापकीय, अध्यापन व आय.टी. क्षेत्रांसाठी उच्च प्रमाणित, उच्च गुणवत्तेचे फॅकल्टी विकास अभ्यासक्रम प्रदान करण्याची कल्पना आहे.
डॉ. दिनेश वाघमारे म्हणाले, सेंटर ऑफ एक्सलन्स या उपक्रमाद्वारे राज्याच्या वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपयुक्त बदल केले जाणार आहेत. विविध आरोग्य विद्याक्षेत्रातील शिक्षकांची उपलब्धता याचबरोबर रुग्णालयांच्या मूलभूत सुविधा तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या बाबींमध्ये अधिक कार्य करता येऊ शकेल, असे नमूद करत आरोग्य क्षेत्रात कौशल्य अभ्यासक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी प्रास्तविक केले. डॉ. विनोद पॉल, अभिषेक गोपालका, निशांत जैन यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठाचे विविध प्राधिकरण सदस्य, शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.
पॅरा क्लिनीकलमध्ये स्टाफ वाढविण्यावर भर
संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा मोठा भाग आरोग्य क्षेत्रात आहे. याचबरोबर पॅरा-क्लिनीकल स्टाफची संख्या वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून डिजिटलाझेशनवर अधिक प्रभावी काम करणे आवश्यक आहे, असे डॉ. दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
हेही वाचा :