Ashok Kharat Pudhari
नाशिक

Ashok Kharat: अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; 5 नरबळींचा संशय, कोर्टात सरकारी वकिलांचा गौप्यस्फोट

Ashok Kharat: गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) आणि क्राईम ब्रांचकडून केला जात आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Ashok Kharat Case Nashik Court Update: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट मिळाली आहे. आरोपी अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याच्या पोलीस कोठडीबाबत सुनावणी सुरू आहे. त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने क्राईम ब्रांचकडून कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) आणि क्राईम ब्रांचकडून केला जात आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय अनेक महिलांनी आरोपीविरोधात तक्रारी दिल्या आहेत. या महिलांची चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जात आहे.

डिजिटल पुरावे गोळा करण्याचं काम सुरु

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितलं की, आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्याच्या तपासासाठी आणखी वेळ आवश्यक आहे. विशेषतः लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये डिजिटल पुरावे गोळा करण्याचं काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडे आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी (PCR) देण्याची मागणी केली आहे.

पाच नरबळी दिल्याचा संशय

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या पिस्तूलाचा वापर करून पाच नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यासंदर्भातील काही प्राथमिक पुरावेही पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आरोपीकडे काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली असून, त्याद्वारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

हरणाची शिकार केल्याची माहिती

याशिवाय आरोपीवर वन्यजीव शिकार प्रकरणाचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्याने हरणाची शिकार करून ‘कस्तुरी’ नावाने काही पदार्थ लोकांना दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.

वाघ, साप दाखवायचा ते खरे की खोटे?

अशोक खरात हा भक्तांना साप, वाघ दाखवायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस कोठडीची मागणी करताना सरकारी वकिलांनी याचा उल्लेख केला. खरातने बोटात घालायचे खडे कुठून आणले, मिश्रित पाणी कुठून आणले, याचा तपास करायचा असून त्याच्याकडे पाच जिवंत काडतुसेही सापडले आहेत, याकडे सरकारी वकिलांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात वकिलांनी गर्दी केली होती. दुपारी साडे तीनच्या सुमारास कोर्टात वकिलांची संख्या वाढत गेली. पावणे चारच्या सुमारास खरात प्रकरणाच्या सुनावणीचा पुकारा झाला. मात्र, त्यानंतर तब्बल 10 मिनिटांनी खरात न्यायालयासमोर हजर झाला. दुपारी 3.50 च्या सुमारास तो न्यायाधीशांसमोर आला. यानंतर सुनावणीला सुरूवात झाली. कोर्टाने अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचं होत असून तपास यंत्रणा विविध अंगांनी या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पुढील तपासाला काय वळणं लागतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT