

Ashok Kharat Turkish Honey scam
नाशिक: स्वतःला ज्योतिषी आणि दैवी शक्तीचा धनी म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पापुद्रे आता एक-एक करून उलगडू लागले आहेत. भोंदूगिरी, लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्यांनंतर आता खरातने लैंगिक समस्यांवर उपाय म्हणून 'तुर्की मधाच्या' नावाखाली उच्चभ्रूंची लाखोंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाच्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहाराचे नवीन धागेदोरे हाती लागले आहेत.
अशोक खरातने ‘एल्विश हनी’ या ब्रँडच्या नावाखाली हे रॅकेट चालवले होते. हे मध तुर्कीमधील एका विशिष्ट गुहेतून आणले जाते आणि ते अत्यंत दुर्मिळ असल्याचे भासवून तो एका किलोसाठी तब्बल ९ लाख रुपये उकळत होता. हे मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करत त्याने व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळातील बड्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या मधात विशिष्ट प्रकारच्या औषधी गोळ्या मिसळून तो ग्राहकांना लैंगिक समस्यांवर उपाय म्हणून विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.
केवळ फसवणूकच नव्हे, तर खरात या पैशांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. आपल्या ट्रस्टच्या नावावर देणग्या स्वीकारून तो आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचे पुरावे SIT च्या हाती लागत आहेत.
सध्या SIT कडून खरातची सखोल चौकशी सुरू आहे. आतापर्यंत लैंगिक शोषण, अघोरी कृत्य आणि बेकायदेशीर गर्भपात यांसारखे ६ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. खरातच्या 'गोड' व्यवसायामागचे हे कडू सत्य पाहून पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे. दरम्यान, त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने त्याला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार असून तपासाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता आहे.