नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
उद्योजक बाबासाहेब नागरगोजे यांच्या निवासस्थानी दोन महिन्यांपूर्वी दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे नूतन पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्याचा तपास करावा यासाठी सातपूर परिसरातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
सातपूर परिसरातील जाधव संकुल येथील लाहोटीनगर येथे उद्योजक बाबासाहेब नागरगोजे यांच्या भगवानगड या निवासस्थानावर अज्ञात दरोडेखोरांनी सकाळच्या सुमारास दरोडा टाकला होता. यात घरातील तीन महिलांसह एका बालकास चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे ५० तोळे सोने दरोडेखोरांनी लंपास केले. घटनेला दोन महिने उलटूनही पोलिसांना अद्याप पर्यंत कुठलाच सुगावा लागू शकलेला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांच्या भेटीनंतरही नागरगोजे परिवाराच्या पदरी निराशा पडली आहे.
या घटनेला दोन महिने उलटूनही अद्याप पर्यंत सातपूर पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाही. म्हणून सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक इंदुमती नागरे, सलीम शेख, सचिन भोर, तानाजी जायभावे, उद्योजक बाबुशेठ नागरगोजे, तानाजी जायभावे, राजेश दराडे, वैभव महिरे, रवी पालवे, सचिन सिंन्हा आदींनी नूतन पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांची भेट घेतली. नागरगोजे यांच्या बंगल्यावर पडलेला दरोड्याचा तपास लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
दरम्यान पोलिसांकडून या गुन्ह्याची उकल होत नसल्याने दरोडेखोरांनी पोलिसांना एक प्रकारे खुले आव्हानच दिले आहे. सदर गुन्ह्याच्या तपासाला उशीर होत आहे. सातपूर पोलिस ठाण्यावर बंदोबस्ताचा ताण वाढला असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा
– सलीम शेख, माजी नगरसेवक
दरोड्याचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. दरोडेखोर अजूनही मोकाट फिरताय त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे.
– इंदुमती नागरे, माजी नगरसेविका