उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गावातला कचरा ट्रॅक्टरमध्ये भरुन टाकला निफाड तहसील कार्यालयाच्या आवारात

गणेश सोनवणे
नाशिक : (निफाड) पुढारी वृत्तसेवा ; ओझर ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावून शासनाने ओझरला नगरपंचायत बहाल केली. मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची निवड झालेली नसल्याने या ठिकाणी प्रशासक म्हणून तहसीलदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तहसीलदारांना तालुक्याचा व्याप सांभाळता सांभाळता ओझरच्या नागरिक सुविधांकडे बघणे अशक्य होऊन गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आरोग्य, पाणीपुरवठा आणि इतर सर्वच सुख सुविधांची वाताहत होऊन गेली आहे. अनेक दिवसांपासून घंटागाडया बंद असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.‌ या व अन्य प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी जि. प सदस्य यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी गावातील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून निफाड येथील तहसिल कार्यालय आवारात टाकत ठिय्या आंदोलन  केले.
याबाबत आंदोलकांचे नेते यतीन कदम यांनी सांगितले, दि. १८ फेब्रुवारी २०२१ पासून निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांची ओझर नगरपरिषदेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. आज दिनांक 23 मार्च २०२२ उलटत असतांनासुद्धा कुठल्याही कामकाजात सुधारणा झालेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ओझर गावामध्ये घंटागाड्या नाहीत. अनियमित पाणीपुरवठा, दिवाबत्तीची दुरुस्ती नाही. कुठलाही नोंदी प्रमाणित करण्यात येत नाहीत. त्यामुळे गावच्या चहुबाजूने, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. याचा निषेध म्हणून आज नागरिक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ओझर गावामधील कचरा गोळा करून तहसील कचेरीत टाकण्याचे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 
ओझर नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आगामी 15 दिवसांकरिता घंटागाड्या सुरू केल्या होत्या परंतु आता पंधरा दिवसांमध्ये नव्याने कायमस्वरूपी घंटागाड्या घेण्यासंदर्भात नव्यानं ई-टेंडरिंगची प्रक्रिया घेण्यात येईल व कायमस्वरूपी घंटागाड्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन निफाड तहसीलदार तथा ओझर नगरपरिषदेचे प्रशासक शरद घोरपडे यांनी आंदोलकांना  दिले. यावेळी माजी जि. प सदस्य यतिन कदम, पंचायत समिती सदस्य नितिन पवार, श्रीकांत अक्कर, सचिन आढाव, बापू गवळी, यात्रा कमेटी उपाध्यक्ष युवराज शेळके, बापू चौधरी, अभिषेक देशमुख, आकाश पाल्हाळ, राहुल घोलप आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

 

SCROLL FOR NEXT