नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले आहे. रितेश भाऊसाहेब चव्हाण ( २२, रा. पेठरोड, पंचवटी) व हर्षल सुनील वणवे (१९, रा. पेठरोड, पंचवटी) असे या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक दुचाकी चोरी प्रकरणी संशयितांचा माग घेत होते.
बुधवारी (दि.२३) प्रशांत देवरे यांना संशयित रितेश चव्हाण चोरीची दुचाकी बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, पोलिस नाईक देवराम चव्हाण,सतीश वसावे, प्रशांत देवरे, जितू शिंदे, विनायक तांदळे, विशाल गायकवाड यांनी पेठ रोड, मखमलाबाद शिवारात सापळा रचून रितेश चव्हाण व सुनील वणवे यास ताब्यात घेतले. या संशयिताकडून दोन केटीएम या महागड्या दुचाकी व एक सीडी डिलक्स अशा तीन दुचाकी हस्तगत केल्या.