जालना : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीत सशस्त्र दरोडा टाकून २ लाखांसह सोने लुटले | पुढारी

जालना : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीत सशस्त्र दरोडा टाकून २ लाखांसह सोने लुटले

तीर्थपुरी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील खारामळा कॉलनीमध्ये रविवारी (दि, २७) पहाटे तीनच्या सुमारास अमोल गवते यांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली. तर घर मालकाला जखमी करत २ लाखांची रोकड आणि ४ तोळे सोने लुटून चोरटे फरार झाले आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, तीर्थपुरी बसस्थानकापासून जवळच असलेल्या खारामाळा कॉलनीमध्ये अमोल गवते यांच्या घरी आज पहाटे ७ ते ८ चोरट्यांनी दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, दरवाज्याचा आवाज आल्याने अमोल गवते यांना जाग आली. त्यांनी चोरट्यांबरोबर प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या डोक्यात काठी मारून त्यांना घायाळ केले. गवते पती-पत्नी दोघेच घरामध्ये होते. तर आई- वडील व भाऊ हे गावी गेले होते.

गवते पती-पत्नी आरडाओरडा करत असल्यामुळे चोरट्यांनी त्यांना बाथरूममध्ये कोंडून टाकले. त्यानंतर कपाटातील २ लाखांची रोकड, पत्नीच्या जवळील तसेच लॉकरमधील अंदाजे ३ ते ४ तोळे सोने लंपास केले. दरम्यान, या कॉलनीमध्ये चोरट्यांनी दोन घरांमध्ये चोरी केली आहे. शेजारीच असलेल्या प्रवीण तांगडे यांच्या घरामध्ये खिडकीची काच तोडून प्रवेश केला. व खालच्या मजल्यावरील कपाटातून अंदाजे एक ते दोन तोळे सोने व दहा ते पंधरा हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असल्याची माहिती मिळाली आहे.

घरमालक प्रवीण तांगडे व अमोल गवते यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारी धावून आले तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या धाडसी सशस्त्र दरोड्यामुळे तीर्थपुरी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जालना येथील डॉगस्कॉड पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button