पुणे : वडगांवपीरच्या माजी सरपंचावर कोयत्याने वार | पुढारी

पुणे : वडगांवपीरच्या माजी सरपंचावर कोयत्याने वार

मंचर ; पुढारी वृत्तसेवा वडगांवपीर (ता.आंबेगाव) येथे जुन्या भांडणातून (शनिवार) रात्री 11 वाजता कोयत्याने वार केल्याने माजी सरपंच संजय पोखरकर आणि त्यांचा एक सहकारी जखमी झाला. या प्रकरणी संतोष राजगुडे यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वडगांवपीर येथे लोकनाट्य तमाशा चालू असताना स्टेजवर मान्यवरांचे मानसन्मान करण्यासाठी स्टेजवर गावचे माजी सरपंच संजय दिगंबर पोखरकर तसेच सावळेराम फकिरा आदक, देवराम पंढरीनाथ आदक गेले होते. स्टेजवरील मानसन्मान उरकून स्टेजवरुन ते खाली उतरले. यावेळी स्टेजपासून ५० फूट अंतरावर चालत गेले. यावेळी गावातील संतोष कचरु राजगुडे याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या व सामाईक असलेल्या बोअरवेलच्या पाण्याच्या वाटपाच्या कारणावरुन लोखंडी कोयत्याने संजय पोखरकर यांच्यावर कायत्‍याने वार केला. यावेळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या कानामागे वार केल्‍याने ते जखमी झाले.

त्यावेळी संजय पोखरकर यांनी मागे वळुन पाहिले असता, संतोषने दुसरा वार टाळू व कपाळावर केला. तिसरा वार करत असताना सावळेराम फकिरा आदक यांनी त्यांचा डावा हातमध्ये घातल्याने त्यांच्या तळहातावर जखम झाली. संतोष यांनी चौथा वार केल्याने संजय पोखरकर यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जखम झाली. जमलेल्या गावातील लोकांनी संतोष कचरु राजगुडे यास पकडले.

याबाबत संजय पोखरकर (वय ४९) यांनी संतोष कचरु राजगुडे रा.वडगाव पीर याच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष राजगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी माजी सरपंच संजय पोखरकर यांच्यावर भोसरी येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.तपास पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे करत आहेत.

Back to top button