नाशिकच्या आमदारांनी सरकारी घरे नाकारावीत, आम आदमी पार्टीचे पत्र | पुढारी

नाशिकच्या आमदारांनी सरकारी घरे नाकारावीत, आम आदमी पार्टीचे पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ सभागृहात राज्यातील 300 आमदारांना फ्लॅट देण्याची घोषणा करताच जनतेमध्ये त्याचा तीव्र संताप करण्यात येत असून, त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पक्षाने नाशिक शहरातील आमदारांची भेट घेऊन आमदारांनी सरकारी घरे नाकारावीत, अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भात आम आदमी पार्टी नाशिक शहराध्यक्ष गिरीश उगले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील चारही आमदारांना प्रत्यक्ष भेटून सरकारी फ्लॅट मोफत मिळत असला तरी न घेण्याची विनंती करणारे निवेदन सादर करण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा एकही आमदार मोफतचे सरकारी फ्लॅट घेणार नाहीत असे जाहीर केले आहे. त्यामुळे आमचादेखील त्यास विरोध असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे यांनी आपच्या पदाधिकार्‍यांना स्पष्ट केले.

नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला असता आपण फ्लॅट घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील फ्लॅट स्वीकारण्यास नकार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या कार्यालयात आपतर्फे निवेदन देण्यात आले.

मोफत फ्लॅट घेण्याच्या निर्णयाविरोधात आपतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश उगले-पाटील, स्वप्नील घिया, चंदन पवार, दीपक सरोदे, चंद्रशेखर महानुभव, योगेश कापसे, बंडू डांगे, सुनील जोरवर, प्रभाकर वायचळे, योगेश कापसे, अ‍ॅड. अभिजित गोसावी, अ‍ॅड. भूषण टाटिया, प्रकाश कनोजे, रितेश सुराणा आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button