उत्तर महाराष्ट्र

नाशिक : येथील एमआयडीसीत लुटारूंचा सुळसुळाट; आठवडाभरातच पाच घटना

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
माळेगाव औद्योगिक वसाहतीत दिवसा मोबाइल व पैशांची लूट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गेल्या आठवडाभरात अशा पाच घटना घडल्याने वसाहतीतील उद्योजक कामगारांत चिंत्रा व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सीमा संघटनेने केली आहे.

कारखान्यातून कामगार सुटण्याच्या वेळी असे प्रकार घडतात. दिवाळीनंतर या घटनांनी जोर पकडला आहे. असाच एक मोबाइल लुटीचा प्रकारही सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. विशेषत: वसाहतीतील 'ब' विभागात जास्त प्रमाणात घटना घडत असल्याचे उद्योजकांनी सांगितले. कामगारास एकटे पाहून लूट केली जाते. प्रसंगी चाकूचा धाक दाखवून पैसे काढले जातात. मोबाइलही हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत. तोंड बांधून भुरटे चोर वेगाने दुचाकी चालवत कामगारांच्या हातात असलेला मोबाइल पळवून नेतात. कामगार एकटा दिसल्यास त्यास अडवून पैसे काढले जातात. दर महिन्याला 7 ते 14 तारखेदरम्यान कामगारांचे वेतन केले जात असल्याने या काळात पैशांची लूट अधिक होत असल्याचे सांगितले जाते.

पोलिस चौकी उरली नावापुरती
यापूर्वी माळेगाव औद्योगिक वसाहतीत कामगारांना लुटण्याच्या घटना सायंकाळनंतर घडत होत्या. सिन्नर- नाशिक महामार्गावरील एल अ‍ॅण्ड टी फाटा, जिंदाल फाटा, वडझिरे घाट येथे लुटीच्या होणार्‍या घटनांची संख्या अधिक होती. आता दिवसाही कामगारांना लुटण्याचे प्रकार घडत असल्याने उद्योजक व कामगारांची चिंता वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी वसाहतीत पोलिस चौकी सुरू करण्यात आली. किमान दीड वर्ष पोलिस कर्मचारी चौकीत आढळून येत होते. तथापि, त्यानंतर चौकीला केवळ कुलूप दिसून येते. त्यामुळे पोलिस चौकी नावालाच उरली आहे.

औद्योगिक वसाहतीत चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. संध्याकाळी 5 नंतर कामगारांचे मोबाइल हिसकावणे, त्यांच्या खिशातून जबरदस्ती पैसे काढून घेणे, मारझोड करणे हे नित्याचेच झाले आहे. पोलिस अधिकार्‍यांनी लक्ष घालून बंदोबस्त करावा. – बबनराव वाजे, सचिव, सीमा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT