

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड शहरात गोवरचे रुग्ण सापडल्याने पुणे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, शहरातील विविध भागांमध्ये सर्व्हे करण्यासोबतच आरोग्य विभागाने प्रथमिक तयारी म्हणून डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 बेडचा विलगीकरण कक्ष सज्ज ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई व परिसरात गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
कोरोनानंतर संसर्गजन्य रोगाकडे गांभीर्याने पाहाणार्या प्रशासनाने गोवरची गंभीर दखल घेतली आहे. गोवरची लक्षणे व उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती सुरू आहे. केले. शहरात 154 गोवरची संशयित मुले सापडली. याचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि हाफकिनकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
दरम्यान, शहरा लगत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात गोवरचे रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य विभागाने गोवरच्या पार्श्वभूमीवर डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 50 बेडचा विलगीकरण कक्ष सज्ज ठेवला आहे. तसेच शहरातील कोंढवा, भवानी पेठ, धनकवडी, नगररस्ता, येरवडा, ढोले पाटील रस्ता, ताडीवाला रस्ता, वारजे, कर्वेनगर आणि आंबेगाव आदी परिसरातील दाट लोकवस्त्यांमध्ये पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे.
या सर्वेक्षणाद्वारे ताप येणे, अंगाला पुरळ येणे, सर्दी, डोके दुखी आणि अशक्तपणा असलेल्या बालकांची माहिती घेवून त्यांचे नमूनेही घेतले जात आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही, याबाबतचे माहिती घेतली जात आहे. लस घेतली नसल्यास लस देण्याचेही काम केले जात असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.