पुणे : उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधीक्षकांची थोपटली पाठ | पुढारी

पुणे : उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधीक्षकांची थोपटली पाठ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्ये जाणारा मद्यसाठा, बनावट मद्य, बेकायदा ढाब्यावर कारवाई, भेसळयुक्त विषारी ताडी, यासह विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून मोक्का अंतर्गत शिक्षेस पात्र असे कौतुकास्पद काम पुणे जिल्ह्यात केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंग राजपूत यांना आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अभिनंदन पत्र देऊन त्यांची पाठ थोपटली आहे.

पुणे जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून सहा महिन्यांपूर्वी रूजू झालेल्या राजपूत यांनी कामाची चुणूक दाखविली. ज्यात पुणे जिल्ह्यात परराज्यातून येणारे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातकडे जाणारा मद्यसाठा तळेगाव दाभाडे येथे जप्त करून कारवाई केली. ढाब्यावर बेकायदा मद्य विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल केले.

भेसळयुक्त विषारी ताडीची विक्री करणा-या गुन्हेगारांविरूध्द पोलिसांशी समन्वय साधून मकोका अंतर्गत कारवाई केली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत या गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तांवाचा पाठपुरावा करून 14 कोटी 27 लाख रकमेचे बंधपत्र घेण्याची कार्यवाही करण्यात आली. याची दखल घेऊन उमाप यांनी अभिनंदन केले.

Back to top button