नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका हद्दीत शौचालयांची उभारणी करताना शासन निकषांची अंमलबजावणी करण्याबरोबरच तृतीयपंथीयांसाठी शहरातील सहाही विभागांत स्वतंत्र शौचालयांची उभारणी करण्यात येणार असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तसे निर्देश दिले आहेत.
महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक व सुलभ शौचालय व्यवस्थापनासंदर्भात आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. शौचालय उभारणीबाबत शासनाने काही निकष घालून दिले असून, या निकषांनुसार महापालिका कार्यक्षेत्रात कमीत कमी दोन शौचालयांची उभारणी केली जावी, अशी सूचना आयुक्तांनी केली. शहरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी सहाही विभागांत स्वतंत्र शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील शौचालयांमध्ये विद्युत व्यवस्था नसल्यास अशा ठिकाणी सौरपॅनल उभारण्याचे तसेच शौचालयांच्या सभोवताली व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. जी शौचालये वापरात नाही अथवा जीर्ण झालेली वा मोडकळीस आलेली आहेत, अशा शौचालयांची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
वीजचोरीची होणार तपासणी…
मनपाच्या बहुतांश सार्वजनिक व सुलभ शौचालयांमध्ये विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, या शौचालयांची देयके जादा येत असल्याची बाब समोर आल्याने संबंधित ठिकाणाहून वीजचोरी होत आहे की काय याची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी विद्युत विभागाला दिले आहेत.