उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अध्यात्म जीवन जगण्याची कला शिकवते – ब्रह्मकुमारी संतोष दीदी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माणूस स्वत:कडे लक्ष न देता दुसर्‍याशी तुलना करतो, स्पर्धा करतो. दुसर्‍यांचे अवगुण सांगताना स्वत:च्या अवगुणांकडे दुर्लक्ष करतो. त्याला इतरांकडे बघायला वेळ आहे; पण स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे माणसाचे जीवन दु:ख- अशांतीने भरले आहे. अध्यात्माला बोअर करणारा विषय समजतात, पण अध्यात्म जीवन जगण्याची कला शिकवत असल्याचे मत ब्रह्मकुमारी संतोष दीदी यांनी मांडले.

माधवराव काळे स्मृती व्याख्यानात 'आध्यात्मिक ज्ञानद्वारा जीवन में सुख शांती की प्राप्ती' या विषयावर शताब्दी वसंत व्याख्यानमालेत य. म. पटांगणावर आठवे पुष्प गुंफताना त्या म्हणाल्या, माणूस नकारात्मक विचार जास्त करतो. मग त्याचा क्रोधाचा बांध फुटतो. मग डोके जड पडते, रक्तदाब वाढतो. दु:ख, मनोविकार दूर करायचा असेल तर विचारांचे परिवर्तन करण्याची गरज असते. तोपर्यंत सुख-शांती मिळत नाही. पवित्रतेशिवाय सुखी राहता येत नाही. जसा विचार माणूस करतो तसा तो घडत जातो. आध्यात्मिक शक्ती मिळवण्यासाठी परमात्म्याशी स्वत:ला जोडा. यामुळे मनोविकार दूर होतात. संस्कार परिवर्तनाने संसार परिवर्तन होते. त्यानंतर दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे यांनी 'किल्ल्यांचा जिल्हा नाशिक' विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी वसंत व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष व पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, मेटच्या संचालिका शेफाली भुजबळ, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे उपस्थित होते. श्रीकांत बेणी यांनी प्रस्तावना केली.

आजचे व्याख्यान
ज्येष्ठ लेखक, पत्रकार, विचारवंत इश्तियाक अहमद (स्वीडन)
विषय : जत्रेत हरविलेल्या दोन भावांची कथा : भारत, पाकिस्तान आणि त्यांचे वेगवेगळे सामाजिक, राजकीय मार्ग.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT