उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘या’ कारणामुळे सिन्नरला इंजिनिअर असोसिएशनचा काम बंद आंदोलनाचा इशारा

गणेश सोनवणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नगर परिषदेच्या नगररचना विभागात सर्व परवानग्या ऑनलाइन मिळत असतानाही इंजिनिअरला नगर परिषदेत विविध ऑनलाइन केलेल्या अर्जांचा मागोवा घेण्यास सगळी कामे सोडून जावे लागते. बांधकाम परवानगी मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. नगररचना विभागाने तातडीने कामकाजात सुधारणा न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सिन्नर सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनने दिला आहे.

नगररचना विभागात कार्यरत असलेल्या सहायक नगररचना अधिकारी यांना प्लॅनिंग इंजिनिअर मदतनीस आहेत. याशिवाय पत्र टायपिंगसाठी एक व ऑफिससाठी एक असे दोन कर्मचारी आहेत. असे असताना कामांची विभागणी करून ती तातडीने मार्गी लावणे अपेक्षित असताना स्थळभेटी, डेटा एन्ट्री मंजूर करणे, बांधकाम परवानगी, कम्प्लिशन देणे ही सर्व कामे सहायक नगररचना अधिकारीच करत असल्याने काम होण्यास तीन ते चार महिने लागतात. तसेच

मर्जीतील लोकांचीच कामे पूर्ण केली जातात, असा आरोप असोसिएशनने केला आहे.
या संदर्भात सहायक नगररचना अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. या सर्व प्रकारात नगर परिषदेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून बांधकाम परवानगीची ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत करावी, अन्यथा सिन्नर सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने काम बंद करण्याचा इशारा अध्यक्ष राहुल तारगे, उपाध्यक्ष वैभव मुत्रक, सेक्रेटरी निशांत माहेश्वरी, सदस्य संजय आणेराव, गणेश हांडोरे, दत्ता बोराडे, रामनाथ सांगळे, नीलेश पवार, समाधान गायकवाड, महेंद्रकुमार तारगे, नंदकुमार पाटील आदींसह नोंदणीकृत सदस्यांनी दिला आहे.

सदर विभागात मिळणार्‍या वागणुकीचा फटका केवळ सिन्नर सिव्हिल इंजिनीअर असोसिएशनलाच नव्हे तर शहरातील सर्वसामान्य जनतेलाही बसत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी लक्षात आणून दिले. यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचे काम वेगाने केले जाते. त्यात कुठलाही खंड पडत नाही. मात्र, इंजिनिअर्सना बोलावल्यानंतर ते वेळेत येत नाहीत. आणि जेव्हा ते येतात तेव्हा अधिकार्‍यांना कामे असतात. आमच्यावर दबावतंत्राचा वापरही केला जातो. – संजय केदार, मुख्याधिकारी

कम्प्लिशनसाठी कराव्या लागतात विनवण्या;
सिव्हिल इंजिनीअर्स असोसिएशनचा आरोप
बांधकाम परवानगीची कामे ऑनलाइन होणे आवश्यक असतानाही नोंदणीकृत इंजिनिअरला वारंवार विनवण्या कराव्या लागतात. नगररचना व्यतिरिक्त नगरपालिकेची दुसरीही कामेही असल्याचे सांगतात. तुमचे काम चालू आहे, आज टाइम मिळाला नाही, अशाप्रकारची कारणे सांगून नोंदणीकृत इंजिनिअर नगरपालिकेमधून परत पाठवले जाते, असे असोसिएशनने म्हटले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT