नाशिक-पुणे रेल्वे : देवस्थान जमिनीचे प्रश्न मार्गी लावा ; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश | पुढारी

नाशिक-पुणे रेल्वे : देवस्थान जमिनीचे प्रश्न मार्गी लावा ; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक तालुक्यातील विहितगाव आणि बेलतगव्हाण गावांमधील देवस्थान जमिनीच्या मालकी वादामुळे भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या महसूल विभागाला दिले आहेत. बुधवारी (दि.13) आणखीन दोन गावांमधील मोबदल्याचे दर प्रशासन घोषित करणार आहे.

बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा सोमवारी (दि.11) ना. पवार यांनी आढावा घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या आढाव्याप्रसंगी नाशिक तालुक्यातील विहितगाव आणि बेलतगव्हाण गावांचा मुद्दा चर्चेला आला. या दोन्ही गावांमध्ये प्रकल्पासाठी भूसंपादन करायच्या जमिनी शेतकरी कसत आहेत. मात्र, जमिनीच्या सातबार्‍यावर देवस्थानांची नावे आहेत. परिणामी, अधिग्रहणाचा मोबदला देण्यावरून स्थानिक यंत्रणांमध्ये संभ—म आहे. त्यामुळे या प्रश्नी तातडीने निर्णय घेत तो निकाली काढावा, असे निर्देश ना. पवार यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत.

शासनाकडून प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा मानस आहे. त्यामुळे नाशिकसह नगर व पुण्यातील अधिग्रहणाचे काम तत्काळ मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत दिल्या. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील चार गावांचे जिरायती जमिनीचे दर यापूर्वीच घोषित केले आहेत. बुधवारी (दि.13) दोन गावांमधील मोबदल्याचे दर हे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. ऑक्टोबरअखेरपर्यंत नाशिक व सिन्नरमधील 22 गावांतील अधिग्रहण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही गंगाथरन डी. यांनी सांगितले.

शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर…
जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सिन्नर तालुक्यातील चार गावांमधील नुकसानभरपाईसाठी 52 ते 68 लाखांचे दर घोषित केले आहेत. प्रशासनाने या गावांमधील मागील तीन वर्षांतील खरेदी व्यवहार विचारत घेत हे दर अंतिम केले असून, त्याच्या पाचपट मोबदला दिला जाणार आहे. पण, भरपाईची रक्कम कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समजते आहे.

हेही वाचा :

 

Back to top button