नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प शिवसेनेने केला असून, त्याच अनुषंगाने 27 ते 30 एप्रिलदरम्यान महानगर शिवसेनेतर्फे शहर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रारंभ बुधवार (दि.27)पासून सकाळी 6.45 वाजता सिम्बॉयोसिस कॉलेज, उपेंद्रनगर येथून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
या उपक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी शालिमार कार्यालयात आयोजित पदाधिकार्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बडगुजर बोलत होते. या काळात सर्व शिवसैनिक स्वतः हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करतील. कचरा संकलित करून तो घंटागाडीमार्फत खतप्रकल्पात पाठवतील. सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेना विविध उपक्रम राबविते आणि स्वच्छता मोहीम त्याचाच एक भाग असल्याचे बडगुजर म्हणाले.
या मोहिमेत शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खा. हेमंत गोडसे, माजी मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे, योगेश घोलप, विलास शिंदे, मनीष बागूल, दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, वैभव ठाकरे, नीलेश चव्हाण आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
अशी असेल स्वच्छता मोहीम…
बुधवार (दि. 27) ः सकाळी 6.45 वाजता सिम्बॉयोसिस कॉलेज येथून मोहिमेचा प्रारंभ होईल.
गुरुवार (दि. 28) ः सकाळी 6.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. आंबेडकर पुतळा, नाशिकरोड.
शुक्रवार (दि. 29) ः सकाळी 6.45 वाजता रामकुंड ते अमरधाम, पंचवटी,
शनिवार (दि. 30) ः सकाळी 6.45 वाजता दूधबाजार ते गाडगे महाराज पुतळा आणि सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज भाजीमार्केट ते अशोकनगर, सातपूर