चिनी कम! | पुढारी

चिनी कम!

काय रे गण्या? कसली एवढी झटापट करतोयस
मोबाईलशी?
ते माझं लाडकं ‘मँडी अ‍ॅप’ शोधतोय हो. गेल्या आठवड्यापर्यंत होतं ते फोनवर. आता सापडत नाहीये काका! कालपर्यंत कित्ती टाईमपास केलेला मी त्यावर. आज गायब झालंय.
चिनी होतं का?
असेलसुद्धा.
म्हणूनच गेलं असेल. बर्‍याचशा चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातलीये सरकारने. त्यात हे गेलं असेल?
काय वैताग आहे साला? क्लॅश ऑफ किंग्ज गेलं, हेल्लो गेलं, टिकटॉक गेलं, आता हेही! लोकांच्या सहज हाताशी असणारी करमणूक का घालवतात कोण जाणे?
अरेरे! असा दुष्टपणा चाललाय होय?

उगाच चेष्टा करू नका काका! पेट्रोल महाग, भटकता येत नाही. मरणाचा उन्हाळा, घराबाहेर पडता येत नाही. मग, थोडी फुक्कटची करमणूक आहे, तीही का गमावायची?
कारण, ती शत्रूने पुरवलेली आहे.
हे जरा पोरकटपणाचं नाही वाटत तुम्हाला? मी कट्टी फू करेन, मी तुझ्या पार्टीत पाय ठेवणार नाही, वगैरेसारखं?
अजिबात नाही. हे फार जास्त गंभीर आहे त्याच्यापेक्षा.
खेळाचा मामला, त्यात शत्रूबित्रू कसला?
अरे, तिकडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 300 अ‍ॅप्सवर बंदी घालून बसलेत. त्यांच्याविरुद्ध घसा फोडून सांगताहेत ते कानावर नाही आलं का तुझ्या?
नाही.

कसं येईल? मोबाईलवर खेळत बसलास की जगाचं काही देणंघेणं उरतं का तुला?
चीनशी राजकीय भांडण आहे ना आपलं?
माहितीये. मग, ते आधी सोडवा म्हणावं तुमच्या जयशंकरना. मग, गदा आणा आमच्या करमणुकीवर!
अरे बाबा, असली अ‍ॅप्स वापरणार्‍यांचा बराच खासगी डेटाही स्टोअर होतो त्यांच्याकडे. त्याचा गैरवापर होऊ शकतो. सायबर हल्ले, हॅकिंग वगैरेंनी देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. कळालं?
हे जरा अतीच ताणल्यासारखं नाही वाटत तुम्हाला? काही धंदा, व्यापाराचा प्रश्न असता, तर गोष्ट वेगळी.
तोही आहे.
कसा काय?

ही अ‍ॅप्स इन्स्टॉल करणं, डाऊनलोड करणं हा डिजिटल इकॉनॉमीचा भाग असतो. शत्रूला चार पैसे मिळवून द्यायला धडपडायचं का आपण?
माझ्यासारख्या पाच-दहा हजार लोकांनी चिनी अ‍ॅप्स घेतली तर असं काय जग बुडणार आहे?
पाच-दहा हजार नाही सोन्या. अ‍ॅप्स डाऊनलोड करणार्‍यांमध्ये भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे. गेल्या एका वर्षात 25 अब्जांपेक्षा जास्त डाऊनलोडस् झालेत आपल्या देशात.

म्हणजे इतके रिकामटेकडे लोक आपल्याकडे आहेत, असं म्हणायचंय का तुम्हाला?
नाही. इतके लोक नवनवी तंत्रज्ञान वापरायला उत्सुक आहेत, असं म्हणतो घटकाभर; पण त्याचा फायदा चीनला होता कामा नये, उपखंडातलं चीनचं महत्त्व वाढू नये, हे
नक्की!

यासाठी तुमच्या मते आणखी काय काय करायचंय आम्ही?
आम्ही नाही, आपण. आपण सर्वांनी. चिनी माल घ्यायचा नाही. चिनी पदार्थ खायचे नाहीत. चिनी अ‍ॅप्स वापरायची नाहीत. चिनी तंत्रज्ञान विकत घ्यायचं नाही. आपल्या दैनंदिनीत ‘चिनी कम’ हेच धोरण ठेवायचं.
कबूल?

– झटका

Back to top button