नासाका न्यूज निफाड,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

Nashik : निफाड कारखाना सुरू होणार, कडलग कंपनीने स्वीकारली निसाकाची सूत्रे

गणेश सोनवणे

 निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

वर्षांनुवर्ष बंद स्थितीत असलेला निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याच्या निवेदा प्रक्रियेत दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथील बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनी अव्वल आली होती. दरम्यानच्या काळात कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करून आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बी.टी.कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात भाडे करारनामा झाला. जिल्हा बॅक प्रशासनाने निफाड सहकारी साखर कारखाना बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरण केला असून उद्यापासून कारखान्याच्या मेंटेनन्सला सुरुवात होणार असल्याची माहिती बी.टी.कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशासनाने दिली आहे.

निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून गेल्या १५ वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने गेल्या दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता. तेव्हापासून साखर कारखाना बंद अवस्थेमध्ये होता. कारखाना सुरू व्हावा यासाठी काही वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते. कारखाना सुरू व्हावा यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून यापूर्वी अनेकदा आंदोलनेही झालेली आहेत. परंतु बँकेचे कर्ज असल्याने कारखाना सुरू होण्यास अनेक अडथळे होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तगाद्यामुळे जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यात देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता.

बँक प्रशासनाने तिन महिन्यांपूर्वी या विषयीची जाहिरात देत टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. पाच मक्तेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. या प्रक्रियेत नाशिक शहरातील प्रसिद्ध बी.टी.कडलग कन्स्ट्रक्शन प्रा.लि.कंपनी निविदा प्रक्रियेत अव्वल आल्याने सदर निविदा मंजूर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात जिल्हा बँक प्रशासन आणि बी.टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीने कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत सोपस्कर पार पाडले. जिल्हा बँक प्रशासन आणि बी. टी. कडलक कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात आज पिंपळगाव येथील रजिस्टर कार्यालयात पंचवीस वर्षांसाठी भाडेकरारनामा झाला. करारनामा पूर्ण होताच जिल्हा बँकेने निफाड कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा बी.टी.कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हस्तांतरित केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, बी.टी.कडलग, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, धनावटे आदी उपस्थितीत होते.

येत्या दोन दिवसात कारखान्यामधील यंत्रसामग्रीच्या मेंटेनन्सचे काम सुरू होणार असून मे महिन्याच्या आत पहिले गाळप घेण्याचा मानस कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. कारखाना आता सुरू होणार असल्याने निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT