

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्याकामा संदर्भात आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला तालुक्यात हिंसक वळण लागले. काल शहरात दोनठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. काल दुपारी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय कार्यालयातील उपअभियंत्याची खूर्ची अज्ञात व्यक्तीने कार्यालयाबाहेर काढून पेट्रोल टाकून जाळली. शहरातील कोरडगावरोड अमरधाम जवळील रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी महामार्गावर टायर पेटवून देत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी घटनस्थळी तातडीने धाव घेत राष्ट्रवादीच्या एका माजी नगसेवककाला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, इतर व्यक्तीचा कसून शोध सुरू आहे.
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या आंदोलनाची धग वाढत चालली असून आमदार नीलेश लंके यांना व त्यांच्या सहकार्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. रस्त्याचे काम झालेच पाहिजे आता नाही तर कधीच नाही, अशी सर्वसामान्यांची भावना असून आता जनता या रस्त्याच्या प्रश्नावर उघडपणे बोलत आहे. खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधींचे तर जनतेकडून वाभाडे काढले जात आहे. अनेक संघटनांनी आमदार नीलेश लंके यांना पाठिंबा दिला आहे. पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून आमदार लंके यांची आंदोलन स्थळी भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ, सल्लागार राजेंद्र शेवाळे, मधुकर मानकर यांनी दिले आहे.