

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दूरदृष्टीने महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. त्यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळेच आम्ही आज व्यासपीठावर असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले. इंदापूरमध्ये शरद कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 9) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना चाकणकर बोलत होत्या.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, सारिका भरणे, विभागीय महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, तालुकाध्यक्ष छाया पडसाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या की, कोरोनानंतर कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाहाची समस्या वाढली आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यात सुधारणा होणे गरजेच असून ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल त्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांच्यावरतीदेखील दोषारोप ठेवून सिद्ध झाल्यावर तीन महिन्यांसाठी त्यांच्या पदाला तात्पुरती स्थगिती द्या, अशी राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला शिफारस करायला सांगितले आहे.