उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महापालिका स्वनिधीतून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करणार, सल्लागार नेमणार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या खासगीकरणातून पुनर्विकास करण्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केल्यानंतर आता हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर महापालिका स्वनिधीतून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करणार असून, त्याकरिता स्वारस्य देकार मागविणार आहेत.

फाळके स्मारकाची दुरवस्था थांबविण्यासाठी महापालिकेने स्मारकाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यानंतर नूतनीकरणाचे घोडे बाजूला पडून पुनर्विकास करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्याचा प्रकार समोर आला. तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी पुढे केलेल्या या पीपीपी तत्त्वावरील प्रक्रियेला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रेक लावत खासगीकरणाच्या प्रक्रियेला विरोध केला. महापालिकेनेच स्मारकाचा पुनर्विकास करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार मनपा आयुक्त रमेश पवार यांनी खासगीकरणाची निविदा प्रक्रिया रद्द केली. यामुळे आता महापालिका स्वत:च्या निधीतूनच स्मारकाची कामे करणार असून, स्मारक खुले करण्याच्या दृष्टीने आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले असून, किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

संगीत कारंजे लवकरच सुरू
फाळके स्मारकातील संगीत कारंजे हे मुख्य आकर्षण होते. मात्र, कालांतराने त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संगीत कारंजासह स्मारकातील इतर कारंजेही बंद पडले. त्यामुळे आता तूर्तास संगीत कारंजासह दोन कारंजे सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

वॉटरपार्क पीपीपी तत्त्वावर
फाळके स्मारक परिसरातील वॉटर पार्क प्रकल्प महापालिका पीपीपी तत्त्वावर सुरू करणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात येणार आहे. हा प्रकल्प 10 वर्षांकरिता ठेकेदारास चालविण्याकरिता देण्यात येणार.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT