नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतर्फे शहरात गुरुवारपासून (दि.१५) गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, २८ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले.
गोवरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत शासन आदेशानुसार गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १२ ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये आरोग्यसेविकांच्या माध्यमातून १३६ बालकांना एमआर १ तर १३९ बालकांना एम आर २ चा डोस देण्यात आला. महापालिकेच्या माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या पथकाने पंचवटी विभागातील औरंगाबाद नाका परिसरात भेट देऊन स्थलांतरित नागरिकांच्या बालकांना डोस दिले. पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर व दुसऱ्या टप्प्यात १५ ते २५ जानेवारी या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण केले जाणार आहे.
समुपदेशनानंतर १७ बालकांना डोस
पंचवटी विभागात औरंगाबाद नाका भागात काही स्थलांतरित नागरिक राहत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय पथकाला मिळाली. पथक त्या ठिकाणी गेले असता येथील नागरिकांनी बालकांना डोस देण्यास नकार दिला. मात्र, समुपदेशनाव्दारे लसीकरणाचे महत्त्व पटवून देत १७ वंचित बालकांना गोवरचा पहिला डोस देण्यात आला. माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, युनिसेफ सल्लागार डॉ. सुमेध कुदळे, युनिसेफ क्षेत्र समन्वयक नलिनी चासकर, तपोवन यूपी एचएससीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पाटील, सुनीता गांगुर्डे, मनीषा खोलासे, आशासेविका चित्रा पवार यांनी या भागात मोहीम राबविली.